मनपा निवडणुकांत उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे टीकास्त्र
By योगेश पांडे | Published: September 21, 2022 11:57 PM2022-09-21T23:57:12+5:302022-09-21T23:57:56+5:30
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःला सांभाळायला हवे. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते अगोदर पहायला हवे, असे ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत त्याचे चित्र दिसलेला व महानगरपालिका निवडणुकांत उरलेला करेक्ट कार्यक्रम करू, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःला सांभाळायला हवे. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते अगोदर पहायला हवे. ते वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असेदेखील बावनकुळे म्हणाले.