हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:39 AM2017-10-24T00:39:54+5:302017-10-24T00:40:18+5:30
हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय पेयजल मंत्री उमा भारती यांनी दिले. रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची सोमवारी (दि. २३) उमा भारती यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.
आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी उमा भारती यांनी १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी आचार्यांना आश्वस्त करताना उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करून हातमाग उद्योगाला केंद्राकडून गती देण्याचा प्रयत्न करू तसेच मदत मिळवून देऊ, असे सांगितले. मध्यप्रदेशातील उद्योगाची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली.
आचार्य विद्यासागरजी महाराज म्हणाले, हातमागाच्या कापड निर्मितीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या सोडविली जाऊ शकते. सोबतच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी हा उद्योग हातभार लावेल. ग्रामस्थांनी त्यांच्या शेतातून पिकविलेल्या कापसाचा धागा बनवावा, हा धागा हातमाग उद्योग खरेदी करेल. घरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या परिवारातीलल सर्व सदस्यांना काम मिळेल. या माध्यमातून भारताच्या ग्रामीण भागात सुवर्ण भूतकाळ परत येईल, देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय तयार होत असलेल्या हातमागावरील कापड हे सर्वोत्तम असल्याचे आचार्य विद्यासागरजी यांनी उमा भारती यांना चर्चेदरम्यान सांगितले.
इंग्रजांनी सर्वात आधी कापड उद्योगातून भारताची लूट केली. आज हजारो मिल्सच्या माध्यमातून देशाचा पैसा विदेशात जातो आहे. हा पैसा देशात थांबविण्याचा हातमाग हा चांगला पर्याय आहे. हाताला काम नसलेला तरुण अनैतिक कामांत, चोरीसारख्या कामात अग्रेसर झाला आहे. या युवाशक्तीला योग्य संस्कार आणि श्रमप्रतिष्ठा दिली तर अराजकताही कमी होऊ शकेल, असा आशावाद आचार्यश्रींनी व्यक्त केला.
आचार्यांनी उमा भारती आणि त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या गंगा नदी शुद्धीकरणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण, सामाजिक आणि मनाची शुद्धता याकरिता शुद्ध संस्कारांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यावर उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत चर्चा करून हातमाग आणि युवक कल्याणार्थ प्रयत्न करू, असे आचार्यांना आश्वस्त केले.
विविध विषयांवर चर्चा
प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण स्थान आहे. आज मी जे काही आहे ही गुरुकृपा असल्याचे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. आचार्यांनी इंडियाऐवजी भारत म्हणा, गोवध बंदी करा, गोवंश वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्या यासोबतच आणखीही काही विषयांवर चर्चा केली. ‘बेटी बचाव’साठी या परिसरात ‘प्रतिभास्थळी’ विद्यार्थिनींची निवासी सीबीएससी शाळा सुरू केली असून येथे शिक्षणासोबत संस्कार दिले जात असल्याचे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.