धनाढ्य तरुण ठरत आहेत ‘हनी ट्रॅप’चे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:16 AM2020-09-10T11:16:27+5:302020-09-10T11:17:14+5:30

धनाढ्य कुटुुंबातील सदस्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून वसुली केली जात आहे. शहरातील अनेक उद्योजक कुटुंबांतील तरुण या टोळीचे बळी ठरले आहेत.

Wealthy young people are falling to the 'honey trap' | धनाढ्य तरुण ठरत आहेत ‘हनी ट्रॅप’चे बळी

धनाढ्य तरुण ठरत आहेत ‘हनी ट्रॅप’चे बळी

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून संबंधित पीडित निराशच

जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनाढ्य कुटुुंबातील सदस्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून वसुली केली जात आहे. शहरातील अनेक उद्योजक कुटुंबांतील तरुण या टोळीचे बळी ठरले आहेत. सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणाने तक्रारी करण्यास पीडित पुढे येत नाहीत. अशाच प्रकारचे एक प्रकरण ५ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात आले. परंतु, तडजोडीच्या नावावर गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही पक्षातील हे प्रकरण लांबवले जात आहे.

सिव्हिल लाईन्स येथील उद्योजक कुटुंबातील तरुणाचे सदर येथे गारमेंटचे शोरूम आहे. काही काळापूर्वी त्याची ओळख नागपूरच्या दोन युवकांशी झाली. या युवकांनी उद्योजक तरुणाची भेट एका १९ वर्षीय विद्यार्थिनीशी घालून दिली. विद्यार्थिनी जरीपटका येथे राहते. तरुणाचे कुटुंब मुळात जरीपटका येथीलच रहिवासी आहे. भेटीनंतर विद्यार्थिनी व तरुणाची चॅटिंग सुरू झाली. चॅट टॉकिंगवरून विद्यार्थिनी तरुणाला मोकळ्या विचाराची वाटली. या संदर्भात भेट घालून देणाऱ्या युवकांना विचारले असता, त्यांनीही विद्याथिर्नीच्या स्वभावाविषयी अपेक्षित मत व्यक्त केले. निश्चित योजनेनुसार दोघेही ३ सप्टेंबरला वर्धा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे काही वेळ घालविल्यानंतर परत आले.

४ सप्टेंबरला सकाळी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी उद्योजक तरुणाला फोन करून, त्यांच्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप लावला. या फोनमुळे तरुण घाबरला. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला आहे. कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा जाण्याच्या भीतीने तरुणाने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना हे प्रकरण चर्चेने सोडविण्याची विनंती केली. परंतु, हे प्रयत्न अपुरे ठरले. ५ सप्टेंबरला विद्यार्थिनी कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचली. तात्काळ प्रतिसाद देत पोलीस विद्यार्थिनीसोबत संबंधित हॉटेलमध्ये पोहोचले. ते हॉटेल दुसऱ्या ठाण्याच्या सीमाक्षेत्रात असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी विद्यार्थिनीचा जवाब नोंदवत, तिच्या कुटुंबीयांना संबंधित ठाण्यात चलण्यास सांगितले. याचदरम्यान उद्योजक तरुणाचे कुटुंबीयही ठाण्यात पोहोचले. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची त्यांची आधीच चर्चा झाली होती. परंतु, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत दुसऱ्या ठाण्यात जाण्यास नकार दिला. त्यांनीच ‘यू टर्न’ घेतल्याने पोलीस आश्चर्यचकित झाले.

गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही कुटुंबीयांमध्ये प्रकरण निपटवण्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकींमध्ये काही अन्य लोकही सहभागी आहेत. ते तरुणाच्या कुटुंबीयांना प्रकरणाची पोलिसी नोंद झाल्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत आहेत. तरुणाचे कुटुंबीय कोणत्याही स्थितीत प्रकरण निपटवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ज्या हॉटेलमध्ये विद्यार्थिनी उद्योजक तरुणासोबत ३ सप्टेंबरला गेली होती, ते हॉटेल अशाच प्रकरणांनी यापूर्वीही चर्चेत राहिले आहे. एसएसबीने छापा मारून येथूनच विदेशी मुलींना देह व्यापार करताना रंगेहात पकडले होते.

स्थिती जैसे थे
२१ ऑगस्टला एमआयडीसीमध्ये औषध कंपनीच्या अधिकाऱ्याशी झालेल्या लुटमारीच्या प्रकरणात ‘हनी ट्रॅप’ उघडकीस आले होते. मात्र, त्यानंतरही स्थिती जैसे थे अशीच आहे. एमआयडीसी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सीआरपीएफमधून निष्कासित सैनिक छोटू ठाकूर आणि त्याची साथीदार रिया आहे. त्यांनी पोलिसांना बरेच दिवस हुलकावणी दिल्यानंतर कोर्टात आत्मसमर्पण केले होते. ते बऱ्याच काळापासून अशा प्रकारच्या टोळीचे संचालन करत आहेत. अनेक श्रीमंत लोक आणि अधिकाऱ्यांना त्यांनी अशाचप्रकारे फसवले आहे. छोटू-रियाची दहशत बघून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

 

Web Title: Wealthy young people are falling to the 'honey trap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.