तो शस्त्रसाठा कुणाचा ?
By admin | Published: September 22, 2015 04:13 AM2015-09-22T04:13:29+5:302015-09-22T04:13:29+5:30
जरीपटक्यातील कपिलनगरात सोमवारी सकाळी आढळून आलेल्या घातक शस्त्रसाठ्यामुळे खळबळ उडाली. तलवारी,
नागपूर : जरीपटक्यातील कपिलनगरात सोमवारी सकाळी आढळून आलेल्या घातक शस्त्रसाठ्यामुळे खळबळ उडाली. तलवारी, कुकरी आणि मोठे चाकू असे हे शस्त्र असून, ते नेमके कुणाचे ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, या शस्त्रसाठ्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे.
कपिलनगर,
प्रजापती आटा चक्कीजवळ प्यारोबाई बलवंतसिंग (वय ६०) यांचे निवासस्थान आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता त्या घराबाहेर आल्या तेव्हा त्यांना कुंपणाजवळ एक पोते बेवारस दिसले. त्यातून चाकू, तलवारी बाहेर निघाल्याचे दिसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर पोलिसांना कळविले. जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. बेवारस पोत्यात तलवारी, कुकरी आणि मोठे चाकू अशी एकूण १३ घातक शस्त्रे होती. ती कुणाची ही स्पष्ट झाली नाही. या भागात रात्रीनंतर समाजकंटकांचा हैदोस असतो. मध्यरात्रीनंतर गुंड शस्त्राची खेप कुणाकडे तरी घेऊन जात असावेत. नेमक्या वेळी गस्तीवरील पोलिसांचे वाहन या भागात आल्यामुळे त्यांनी शस्त्राचे पोते फेकून पळ काढला असावा, असा संशय आहे. मात्र, गस्तीवरील पोलिसांचे त्यावेळी या पोत्याकडे लक्ष गेले नसल्याचेही यातून उघड झाले आहे. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)