फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या घरात मिळालेले शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 AM2021-05-11T04:07:36+5:302021-05-11T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घ्यायला गेलेल्या पोलिसांना आरोपीच्या घरात तलवार आणि जिवंत काडतूस आढळले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घ्यायला गेलेल्या पोलिसांना आरोपीच्या घरात तलवार आणि जिवंत काडतूस आढळले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी अमित संजय स्वामी याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आरोपी अमित स्वामी याने आपल्या दोन कार दोन लाख रुपयांत गहाण ठेवल्या होत्या. रक्कम परत करून त्या कार घेण्यासाठी गेलो असता आरोपीने कार परत न करता फसवणूक केली, अशी तक्रार निमिषा देवा ऊर्फ देवानंद शिर्के (वय ४९) यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात रविवारी नोंदवली. २७ डिसेंबर २०२० ला हा व्यवहार झाल्याचेही शिर्के यांनी तक्रारीत नमूद केले. त्यामुळे स्वामी विरुद्ध गुन्हा दाखल करून सक्करदरा पोलिसांचे पथक त्याच्या हुडकेश्वरमधील घरी रविवारी चौकशीसाठी गेले. यावेळी आरोपीच्या घरी तपासणी केली असता पोलिसांना एक तलवार तसेच जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. आरोपीचे घर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला हुडकेश्वरमध्ये अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर आरोपी अमित स्वामीला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली जाईल, असे ठाणेदार सत्यपाल माने यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, आरोपी अमित स्वामी आणि देवा शिर्के हे दोघेही चांगले मित्र होते. शिर्केला आधी व्यसन होते. त्यावेळी हा व्यवहार झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. कुख्यात गुंड मंगेश कडव याला गुन्हे शाखेने गेल्यावर्षी अटक करून त्याच्या अवैध सावकारीचे साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले. त्याच्या ताब्यातून लाखोंची मालमत्ता जप्त केली. मंगेश कडवणने फसवणूक करून धमकी दिल्यामुळे शिर्केने गेल्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कडवणविरुद्ध गुन्हादेखील दाखल झाला होता.
---