ताडोबातील पर्यटकांच्या सेवेत दाखल होऊ पहातोय वेदर ऑब्झर्व्हेशन टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 09:54 AM2020-12-03T09:54:16+5:302020-12-03T09:56:51+5:30
Tadoba Nagpur News केंद्रीय हवामान विज्ञान विभागाकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वेदर ऑबर्व्हेशन टॉवर उभारण्याची योजना आहे. पर्यटकांना या टॉवरच्या आधारावरून वातावरणाचा अंदाज घेता येऊन आपले प्रवासाचे नियोजन करणे करणे शक्य होणार आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : ताडोबात जाण्याचे नियोजन करू पहाणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना खुशखबर आहे. केंद्रीय हवामान विज्ञान विभागाकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वेदर ऑबर्व्हेशन टॉवर उभारण्याची योजना आहे. पर्यटकांना या टॉवरच्या आधारावरून वातावरणाचा अंदाज घेता येऊन आपले प्रवासाचे नियोजन करणे करणे शक्य होणार आहे.
केंद्रीय हवामान विज्ञान विभागाकडून प्रत्येक राज्यामध्ये टुरिझम फोरकास्ट अंतर्गत वेदर ऑब्झर्व्हेशन टाॅवर उभारण्याची योजना आहे. त्या अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये उभारला जाणारा हा पायलट प्रोजेक्ट असून या अंतर्गत प्रत्येक राज्यात प्रारंभी एक टॉवर उभारण्याची योजना आहे. भारत हवामान विज्ञान विभागाच्यावतीने सध्या या संदर्भात प्राथमिक स्तरावर तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार, टुरिझम फोरकास्ट अंतर्गत देशात असलेल्या महत्वाच्या पर्यटनांच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक पातळीवर महत्वाचा गणला जात असून देशविदेशातून पर्यटक येतात, त्यांच्या सुविधेच्या दृष्टीने आणि पर्यटन विकासाला चालना मिळावी, या हेतूने प्रायोगिक तत्त्वावर ताडोबाची निवड करण्यात आली आहे.
व्याघ्र प्रकल्पातील या उभारणीसाठी लवकरच जागेची पहाणी केली जाणार आहे. त्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नागपूर हवामान विज्ञान केंद्राने पत्र पाठविले असून जागेच्या पहाणीसाठी आणि पुढील नियोजनासंदर्भात विनंती केली आहे. या ठिकाणी परवानगी नाकारल्यास अन्य जागेचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. येथील टॉवर उभारणीच्या प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे ताडोबा प्रकल्पाच्या परवानगीवर अवलंबून आहे.
हवामान विभागाचे चार ॲप कार्यन्वित
हवामान विभागाचे सध्या चार मोबाईल ॲप कार्यरत आहेत. त्यापैकी मौसम नावाचा ॲप वातावरण बदलाची माहिती कळवितो. मेघदूत हा ॲप पर्जन्यमानासंदर्भात माहिती देतो. दामिनी या ॲपवरून विजांची माहिती मिळते. या सोबतच केंद्र सरकारच्यावतीने चालविला जाणारा उमंग हा ॲपदेखिल आधीपासून कार्यरत आहे. शेतकरी तसेच नागरिक मोबाईलवर हा ॲप डाऊनलोड करून वातावरण बदलासंदर्भातील अधिकची माहिती मिळवू शकतात.
टुरिझम फोरकास्ट अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ऑब्झर्व्हेशन टॉवर उभारण्याची योजना आहे. त्या दृष्टीने पत्रव्यवहार केला आहे. जागेची निश्चिती होताच कामाला सुरुवात होईल.
- ब्रिजेश कनोजिया, वैज्ञानिक-सी