नागपुरात उत्साहात पार पडले बाहुला-बाहुलीचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:21 PM2018-05-18T23:21:23+5:302018-05-18T23:21:35+5:30
बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह मोठ्या उत्साहात हे आयोजन करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. या जुन्या आठवणींची नव्याने ओळख दीनदयाल शोध संस्थान, बालजगतने शुक्रवारी करून दिली. बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन येथे करण्यात आले व यात बालकांसमवेत पालकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह मोठ्या उत्साहात हे आयोजन करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. या जुन्या आठवणींची नव्याने ओळख दीनदयाल शोध संस्थान, बालजगतने शुक्रवारी करून दिली. बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन येथे करण्यात आले व यात बालकांसमवेत पालकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
बालजगतच्या उन्हाळी शिबिरांतर्गत बालसंगम व बालरंजन शिबिरात या लुटुपुटीच्या लग्नाचा बेत आखला गेला. ठरलेल्या मुहूर्तावर सजलेले वर-वधू तयार झाले. वराची आई नम्रता पिंपळखुटे व वधूची आई दीपा मानमोडे या सर्वांचे स्वागत करीत होत्या. बच्चेकंपनी आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंडळीही आकर्षक पारंपरिक वस्त्र परिधान करून लग्नात सहभागी झाले. बालजगतच्या परिसरातून थाटात बाहुल्या वराची वरात काढण्यात आली. तिकडे वधू झालेली बाहुलीही नवरीच्या वस्त्रात तयार होऊन वाट पाहत होती. वरात मांडवात पोहचली तसे वर-वधूला खुर्चीवर बसवण्यात आले. भटजींनी मंगलाष्टक म्हणून लग्नाचा धुमधडाका वाजविला आणि वºहाड्यांनीही आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या.
पूर्वी लहानग्यांच्या खेळात बाहुला-बाहुलीचे लग्न हा हमखास आवडीचा कार्यक्रम. भातुकलीचा खेळ बालकांच्या उत्साहाचा भाग असायचा. यामध्ये थोरामोठ्यांनीही आनंदी वाटायचे. चुरमुऱ्याचे लाडू, भात हे पदार्थ मुलांच्या उत्साहात भर घालायचे. शुक्रवारचे आयोजन बालवर्गाला अनोखा अनुभव देऊन गेला, सोबतच ज्यांनी हा अनुभव घेतला ते पालकवर्ग त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत हरवले होते. बालजगत गेल्या १६ वर्षापासून हे आयोजन करीत आहे.
बालजगतचे सचिव जगदीश सुकळीकर व माधवी जोशीराव यांच्या नेतृत्वात झालेल्या या विशेष लग्नात मंजिरी घाटे, पल्लवी देशपांडे, दर्शना पुणेकर, श्रद्धा श्रोत्री, प्रतिमा देव, योगिता मोहरील, ऋचा जोशी, निकिता लुटे, मोहिनी देवपुजारी, डॉ. उषा शिराळकर आदींचा सहभाग होता.