सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 09:19 PM2020-01-20T21:19:49+5:302020-01-20T21:22:06+5:30
शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नसोहळ्यात अमाप खर्च करून आनंद लुटला जातो. या आनंदात थोडी सामाजिक बांधिलकीची किनार लाभली तर तो आनंद नक्कीच द्विगुणित होतो. शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात याची अनुभूती आली. वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली.
भूमिका पांडे व मिथ चौधरी यांचा हा लग्नसोहळा होता. वधू भूमिका यांची आई सविता पांडे या सामाजिक कार्यकर्ता आहेत, तर वर मिथ हा कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे दोघांनाही ग्रामीण भागाची अवस्था, शेतकऱ्यांची विवंचना याची जाणीव आहे. ही जाणिवच या लग्नसोहळ्याला सामाजिक बांधिलकीची किनार लावून गेली. या लग्नसोहळ्याला आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले. सोमवारी हा लग्नसोहळा पार पडला. सामाजिक बांधिलकी म्हणून या लग्नसोहळ्यादरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी हरिराम नारनवरे राहणार मोहडी दळवी तालुका नरखेड यांच्या पत्नी मंदाताई हरिराम नारनवरे यांना ११,१११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर धापेवाडा तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी महादेव रानडे यांच्या पत्नी वंदना रानडे यांना, शेगावमधील रहिवासी शेतकरी मुरलीधर शेंडे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती, त्यांची पत्नी सीमा यांना, वर्धा जिल्ह्यातील बालकिशोर प्रभाकर झाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा प्रत्येकी ११,१११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच अनाथालय चालविणारी जीवन आश्रय सेवा संस्था राणी दुर्गावती चौक व मेडिकलची स्लॅब कोसळून मृत झालेल्या वनिता वाघमारे यांची मुलगी साक्षी वाघमारे यांनाही ११,१११ रुपयांची मदत धनादेशाच्या रुपात करण्यात आली.
पांडे व चौधरी कुटुंबीयांनी केलेली ही मदत खूप मोठी नाही, पण या माध्यमातून समाजात सामाजिक भाव रुजावा हा आहे. आपले आनंदसोहळे साजरे करताना पीडितांचे दु:ख कमी करण्याचे भान समाजातही रुजल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते.