नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवन परिसरात विवाह समारंभ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:15 AM2018-02-09T10:15:02+5:302018-02-09T10:16:58+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा भवन संवेदनशील मानण्यात येते. परंतु विद्यापीठाला एका काळात दानात मिळालेल्या या परिसराचा उपयोग आता व्यावसायिक उपक्रमांसाठी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा भवन संवेदनशील मानण्यात येते. परंतु विद्यापीठाला एका काळात दानात मिळालेल्या या परिसराचा उपयोग आता व्यावसायिक उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. नियमानुसार येथे शैक्षणिक उपक्रमांशिवाय कसलेही आयोजन करण्याची परवानगी नाही. परंतु या परिसरात चक्क विवाह समारंभासोबतच इतर अशैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची बाब समोर आली आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर हे प्रकार घडत असतानादेखील आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
विद्यापीठाच्या कुठल्याही परिसरात शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांनादेखील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु गुरुवारी परीक्षा भवन परिसरात कुठलीही परवानगी न घेता विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले. परीक्षा भवनाच्या मुख्य इमारतीपासून काही पावलांच्या अंतरावरच मंडपसुद्धा टाकण्यात आला. इतकेच काय तर जवळच शैक्षणिक संस्थादेखील असताना सर्व नियम धाब्यावर बसवत ढोलताशेदेखील वाजविण्यात आले.
समारंभाच्या आयोजकांनी परिसरात स्थित विद्यापीठाच्या कर्मचारी क्रेडिट सोसायटीच्या इमारतीच्या उपाहारगृहाचादेखील उपयोग केला. समारंभाच्या तयारीत असलेले लोक सोसायटीच्या इमारतीत मुक्तपणे संचार करीत होते.
ही कुणाची ‘कृपा’?
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांना संपर्क केला असता, विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा भवन परिसरात अशाप्रकारच्या कुठल्याही आयोजनाची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. हे आयोजन कुणी केले, याचीदेखील माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राहुल खराबे यांना संपर्क केला असता, सोसायटीच्या सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीतील सभागृहातच कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. परीक्षा भवन परिसरात कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सोसायटीच्या इमारतीतील उपाहारगृहाचा उपयोग कसा काय झाला, या प्रश्नाचे त्यांच्याकडे कुठलेही उत्तर नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याची संपूर्ण माहिती आहे, मात्र स्वत:ला यातून ते दूर ठेवत आहेत. बुकिंग सभागृहाचे झाले व उपयोग परिसरातील जागेचा करण्यात आला.
परिसराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
सोसायटी इमारतीजवळच विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम होते. जेथे लग्नाचे आयोजन करण्यात आले, तेथून हे ठिकाण केवळ काही पावलांवर आहे. येथे परीक्षेशी संबंधित सर्व गोपनीय कामे होतात. इमारतीजवळ अभ्यागतांना येण्याजाण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांनादेखील सायंकाळी ५ वाजेनंतर परिसरात येण्याची मनाई आहे. सोसायटीच्या इमारतीसाठीदेखील हेच नियम आहे. परंतु बाहेरील लोक अनेकदा रात्री येथे फिरताना दिसून येतात. सुरक्षेसंदर्भात इतकी मोठी हेळसांड होत असताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी व ‘एलआयटी’च्या संचालकांनीदेखील तक्रार का केली नाही हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.