विवाह ठरला सामूहिक अवयवदानाचा सोहळा
By admin | Published: March 27, 2017 02:11 AM2017-03-27T02:11:36+5:302017-03-27T02:11:36+5:30
कुणी पाण्यात विवाह करतो तर कुणी हवेत तरंगत विवाह करतो. पण ते हौस आणि प्रसिद्धीसाठी असते. त्यात समाजोपयोगी काय, हा प्रश्न गौण असतो.
वर-वधूसह ३० वऱ्हाड्यांची नोंदणी : योगेश आणि प्रियंकाचे कौतुक
नागपूर : कुणी पाण्यात विवाह करतो तर कुणी हवेत तरंगत विवाह करतो. पण ते हौस आणि प्रसिद्धीसाठी असते. त्यात समाजोपयोगी काय, हा प्रश्न गौण असतो. मात्र आयुष्याच्या या महत्त्वाच्या क्षणी आपण समाजाला काय देऊ शकतो, हा विचार फार थोड्यांच्या मनात असतो. योगेश आणि प्रियंका या नवदाम्पत्याने त्यांच्या विवाह समारंभात अवयवदानाचा संकल्प करून सामाजिक भान जपले. वर-वधूच्या पुढाकाराने प्रेरणा घेत त्यांचे कुटुंबीय आणि काही वऱ्हाड्यांनीही अवयवदानासाठी नोंदणी करून घेतली. यामुळे हा लग्न समारंभ सामूहिक अवयवदानाचा सोहळा ठरला.
नागपुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक योगेश वनकर आणि प्रियंका बागडे यांचा हा अनोखा विवाह रविवारी पार पडला. मूळचा गडचिरोली येथील योगेश याने पदवी अभ्यासक्रमाच्या वेळी अवयव दानाचा विचार केला होता. समाजालाही हा संदेश देण्यासाठी स्वत:च्या लग्नात आपल्या संकल्पाला मूर्त रूप देण्याचे ठरविले. समाजसेवेची आवड असलेली वधू प्रियंका बागडे हिलाही हा विचार पटला. योगेशच्या घरची मंडळी त्याच्या संकल्पाच्या पाठीशी उभी राहिली तर प्रियंकाच्या कुटुंबीयांनीही याला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर दोन्ही कुटुंबीयांनीही या अभियानात सहभाग घेतला तर वधु-वराचे काही मित्रही यात सहभागी झाले. योगेशचे वडील आनंदराव वनकर व प्रियंकाचे वडील मनोहर बागडे यांनीही यात पुढाकार घेतला. ठरल्याप्रमाणे विवाह समारंभापूर्वी वधू-वरासह दोन्ही कुटुंबीय मिळून २३ लोकांनी अवयवदानाची नोंदणी करून घेतली. त्यानंतर संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून बौद्ध पद्धतीने विवाहाचे सोयस्कर पार पडले.
विवाहाच्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टॉल लावण्यात आला होता. त्यानुसार आलेल्या पाहुण्यांना अवयवदानाचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही लोकांनीही आपले इंद्रियदान करण्यासाठी नोंदणी केली. अशाप्रकारे एकाचवेळी ३० ते ३५ लोकांनी अवयवदानाच्या अभियानात सहभागी होऊन एक नवा पायंडा पाडला.(प्रतिनिधी)
एक विवाह असा ही...
नागपूरमध्ये पहिल्यांदा असा विवाह पार पडला. मेडिकलद्वारे अशाप्रकारे अवयवदानाची जागृती करण्यासाठी विवाह समारंभात स्टॉल लावण्याचा पहिलाच उपक्रम आहे. नियोजित वर योगेशने भेटून त्याचा विचार मांडला आणि मेडिकलकडून काही करता येईल का, अशी विचारणा केली. वधू-वरांच्या कुटुंबीयांचा विचार घेत मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांना लग्न समारंभात स्टॉल लावण्याची परवानगी मागितली व त्यांनीही त्वरित याला होकार दिला. हा आमच्यासाठी नवा अनुभव होता. आलेल्या पाहुण्यांमध्येही बऱ्यापैकी अवयवदानाबाबत जागृती दिसली.
-आशिष वाळके, समाजसेवा अधीक्षक, मेडिकल
वऱ्हाड्यांना झाड आणि पुस्तक भेट
एरवी लग्नात वऱ्हाडी वधू-वरांसाठी भेट घेऊन येतात. मात्र या लग्नात आलेल्या पाहुण्यांनाच वधु-वरांकडून भेट मिळाली. ही भेट म्हणजे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी एक झाड आणि एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जाती निर्मूलनाचा लढा’ हे पुस्तक पाहुण्यांना भेट देण्यात आले.
त्याच वेळी संकल्प घेतला
माझा एक मित्र लिव्हर निकामी झाल्याने मृत्यू पावला. त्यावेळी त्याला लिव्हर मिळाले असते तर तो जगला असता. तेव्हा आपले डोळे, यकृत व इतर अवयव दान करण्याचा संकल्प मी केला. लग्न ही माझ्यासाठी नवीन जीवनाची सुरुवात आहे. त्यामुळे याचवेळी नवीन संकल्प घेण्याचा निर्णय केला. लग्नात ३० ते ४० लोक यात सहभागी होतील. त्यामुळे गरजूंना याचा भविष्यात लाभ मिळेल, हा माझ्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
- योगेश वनकर, वर
पे बॅक टू सोसायटी
मृत्यूनंतर आपला देह एकतर मातीत पुरला जातो किंवा जाळला जातो. त्याचे अवशेष राहत नाही व मृत्यूनंतरच्या स्वर्ग, नरक या संकल्पना खोट्या आहेत. त्यामुळे आपले शरीर दान केले तर ते कुणाच्या तरी कामी येईल ही शाश्वती आहे. आपल्या डोळ््यांनी कुणी अंध हे जग पाहू शकेल तर कुणाला आपल्या इतर अवयवांचा फायदा मिळेल. त्यामुळे त्यांच्यात आपले अवशेष जिवंत राहतील. हे एक प्रकारे ‘पे बॅक टू सोसायटी’ आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने समानतेची, बंधुत्वाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आम्ही संविधान वाचून विवाह केला.
- प्रियंका बागडे, वधू