आठवडी बाजारात उपाययाेजनांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:59+5:302021-02-05T04:38:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरात दीर्घ काळानंतर शुक्रवारी (दि. २९) आठवडी बाजार भरला. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरात दीर्घ काळानंतर शुक्रवारी (दि. २९) आठवडी बाजार भरला. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. दुसरीकडे, या बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे कुणीही पालन करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडू शकताे, अशी शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली.
काेराेना संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण आठवडी बाजारावर बंदी घातली हाेती. दिवाळीनंतर ही बंदी काही प्रमाणात हटविण्यात आली हाेती. मात्र, सावनेर शहरातील आठवडी बाजार दिवाळीपासून आजवर जेमतेमच भरायचा. दरम्यान, शुक्रवारी (दि. २९) भरलेल्या बाजारात नागरिकांची पूर्वीप्रमाणेच प्रचंड गर्दी दिसून आली. या बाजारात नेहमीप्रमाणे सावनेर तालुक्यासह लगतच्या साैंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) तालुक्यातील गावांमधील शेतकरी, शेतमजूर व इतर नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी आले हाेते.
शिवाय, त्याच प्रमाणात भाजीपाल्यासह अन्य साहित्यांची विक्री करणाऱ्यांनी आपापली दुकाने थाटली हाेती. मात्र, बाजारात वावरणाऱ्या बहुतांश नागरिकांनी खरेदी विक्री करताना मास्कचा वापर केला नव्हता. दुकाने दाटीदाटीने थाटण्यात आली हाेती, तर ग्राहकही खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते. काेराेना संक्रमणाचा लवलेश कुणाच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता. दुसरीकडे, काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी नागरिकांनी आणखी काही काळ उपाययाेजनांचे पालन करणे गरजेचे आहे, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली.