संघाच्या ‘लाईव्ह’ पुढाकाराचे सर्वस्तरांतून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:17 PM2018-09-19T23:17:49+5:302018-09-19T23:19:04+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सेवासदन हायस्कूलच्या सभागृहात सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी विविध विचारधारांचे लोक एकत्र आले होते. संघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रथमच अशाप्रकारचे आयोजन झाले व यामुळे अनेक गोष्टींबाबत खुलासा झाला, असा या मंडळींचा सूर होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सेवासदन हायस्कूलच्या सभागृहात सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी विविध विचारधारांचे लोक एकत्र आले होते. संघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रथमच अशाप्रकारचे आयोजन झाले व यामुळे अनेक गोष्टींबाबत खुलासा झाला, असा या मंडळींचा सूर होता.
विश्वसंवाद केंद्र व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत इतर विचारधारांचे व विविध क्षेत्रांतील लोकदेखील उपस्थित होते. सरसंघचालकांनी संघकार्य, आरक्षण, गोरक्षा, सामाजिक समरसता, राजकारण, शिक्षणपद्धती, इतर धर्मातील चांगल्या गोष्टी, संस्कृती संवर्धन याबाबत भाष्य केले. एरवी आमच्या मनात संघाबाबत अनेक गैरसमज होते. संघ केवळ ठराविक चौकटीत काम करणारी व एकाच विचारधारेवर चालणारी संघटना आहे, असे आम्हाला वाटायचे. विविध माध्यमातून असे चित्रदेखील उभे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात संघाची कार्यपद्धती व त्यांची भूमिका याबाबतचे गैरसमज आज दूर झाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. बऱ्याच जणांनी वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव प्रकाशित करू नये अशी प्रसारमाध्यमांना विनंती केली. याव्यतिरिक्त कार्यक्रमाला ‘आरपीआय’ गवई गटाचे नेते प्रकाश कुंभे, सेंट्रल बँक ‘एससी एसटी’ असोसिएशनचे नेते दादा उके, स्टेट बँक ‘एससी एसटी युनियन’चे नेते व्रजबोधी मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, धर्मपाल मेश्राम, वाल्मिकी समाजाचे नेते सुंदरलाल ताकभोरे, कशोर बिरला, राज मेहर हेदेखील यावेळी उपस्थित होते.
संघाने सर्वांपर्यंत पोहोचावे
साधारण: संघात कार्य करणारे लोक हे आपल्या कार्याबाबत फारशी वाच्यता करत नाही. संघाने प्रसिद्धीपराड्.मुख भूमिका घेतल्याने समाजातील गैरसमज वाढत गेले. त्यामुळे संघाने आपले कार्य जास्तीत जास्त प्रमाणात समाजापर्यंत पोहोचविले तर गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल, असा संघ परिवाराव्यतिरिक्त उपस्थित मान्यवरांचा सूर होता.
संघ परिवारातदेखील उत्सुकता
देशाला पडलेल्या विविध प्रश्नांना सरसंघचालक नेमके कसे उत्तर देतात हे ऐकण्याची संघ परिवारातील संघटनांच्या प्रतिनिधींनादेखील उत्सुकता होती. विशेष म्हणजे नागपुरात संघ मुख्यालय असून विजयादशमीसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम येथे होतात. येथील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण विविध ठिकाणी आयोजित करण्यात येते. मात्र नवी दिल्लीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहणे हा नागपूरकरांसाठी एक नवीनच अनुभव होता.