नागपुरात ‘माझी मेट्रो’चे उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:26 AM2019-01-16T00:26:36+5:302019-01-16T00:28:00+5:30
महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. खापरी उड्डाणपुलाजवळ लेझिम, ढोल ताशाच्या मिरवणुकीत मेट्रो कोचेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. खापरी उड्डाणपुलाजवळ लेझिम, ढोल ताशाच्या मिरवणुकीत मेट्रो कोचेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
डाऊन टाऊन झोनच्या रोटरी क्लबद्वारे विधिवत स्वागत करण्यात आले. नागरिकांची मेट्रो कोचेस बघण्याकरिता एकच गर्दी झाली. नागपूरकरांनी कोचेसचे स्वागत फुलांचा वर्षाव करून हर्षोल्हासात केले. ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनीही सहभाग घेतला. मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनीही हा क्षण मोबाईल कॅमेरामध्ये टिपला. ट्रेलरला वर्धा मार्गावरून मिहान डेपोपर्यंत नेण्यात आले. कोचेसची जोडणी करून धावण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे.
चीनमधील दालीयान येथून १५ डिसेंबरला निघालेले कोचेस समुद्री मार्गाने ५ जानेवारीला चेन्नई बंदरात आणण्यात आले. कोचेस चेन्नई येथून लॉजिस्टिकच्या माध्यमातून ६ जानेवारीला रात्री रवाना करण्यात आले. १० दिवसांच्या प्रवासानंतर आणि १५ कर्मचाऱ्यांच्या परिश्रमानंतर नागपुरात पोहोचले. ट्रेलरची गती २० ते ३० कि़मी. प्रति तास होती. एका ट्रेलरवर एक कोच ठेवण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक रात्री करण्यात आली.
या कोचमध्ये दोन व्हॅकुम सर्किट ब्रेकर्स, इथरनेट बेस्ड ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट यंत्रणा आहे. त्यामुळे सुरक्षा आणि विश्वसनीयेत वाढ होणार आहे. याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फिचर हे अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त आहे. कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक सोईसुविधा आहेत. आंतरिक कलाकृती, एलईडी बल्ब, आपत्कालीन दरवाजे, एलईडी आधारित मार्गदर्शिका, स्वयंचलित घोषणा प्रणाली, नैसर्गिक थीम कोचेसवर आकारण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेंद्र उपाध्याय, उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) रमण, रोटरी व्लब नागपूर डाऊन टाऊनचे पदाधिकारी निशिकांत काशीकर, स्नेहल काशीकर, पंकज दहीकर, संदीप हटेवार, अपूर्व नायक, मंथन पटले, सुरेश लांगे व नागपूर सायकलिंग ग्रुपचे नीतू काटेर, प्रियंका देवासे, सोनल बरबटकर उपस्थित होते.