वेलकम मिस्टर कमिश्नर टू नागपूर; रवींद्रकुमार सिंगल यांनी स्वीकारला पदभार
By योगेश पांडे | Published: February 1, 2024 11:11 PM2024-02-01T23:11:29+5:302024-02-01T23:11:43+5:30
गुंडांची दादागिरी मोडून काढणार
योगेश पांडे
नागपूर : नागपुरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला. रात्री नागपुरात आल्यावर त्यांनी थेट पोलीस भवन गाठले व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. सलोखा-समन्वय-सुरक्षा अन् सुशासन या त्यांच्या चतु:सुत्रीचा त्यांनी पुनरोच्चार करत निवडणूकांच्या तोंडावर गुन्हे नियंत्रण व शांतता प्रस्थापित राहण्यावर भर असेल असे स्पष्ट केले. यासोबतच शहरातील गुंडगिरी व दादागिरी मोडून काढण्यात येईल अशी भूमिका मांडत त्यांनी गुंडांना थेट इशाराच दिला.
रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालयात आगमन झाले. यावेळी सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे, संजय पाटील, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, अश्विनी पाटील, अर्चित चांडक, प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील एकूण गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन मग त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. मात्र प्रभावी पोलिसिंगवर आपला भर असेल. विशेषत: पोलीस विभागातील सर्व सहकारी व समाजाला सोबत घेऊन काम करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सुरक्षेप्रती आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. युवापिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकते आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचे जाळे मोडून काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी यासाठी जनतेचा एकूणच सहभाग वाढवू, असे सिंगल यांनी सांगितले.
- ‘न’पासून सुरू होणाऱ्या शहरांसोबत विशेष स्नेह
मी नागपुरात अगोदरदेखील काम केले आहे. हे शहर शांतताप्रिय आहे. ‘न’ अक्षराने सुरू होणाऱ्या शहरांसोबत माझा विशेष स्नेह आहे. नांदेड, नाशिकनंतर आता नागपुरमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
- पोलीस आयुक्तांसमोरील आव्हाने
- शहरातील वाढते गंभीर गुन्हे व निर्ढावलेले गुन्हेगार
- शहरातील मुख्य मार्गांवर मोडकळीस आलेली वाहतूक व्यवस्था
- सकारात्मक पोलिसींग
- महिलांवरील वाढते अत्याचार, विनयभंग, अपहरण व एकूण गुन्हे
- शहरातील वाढत्या घरफोड्या व चोरीची प्रकरणे
- वाढते सायबर गुन्हे व आर्थिक गुन्हे
- अंमली पदार्थांचे वाढते जाळे
- नाईट कल्चरमध्ये सुरू असलेला उन्माद व त्यातून घडणारे गुन्हे
- पोलीस कर्मचाऱ्यांमधील लाचखोरीची कीड
- अकार्यक्षम डीबी पथके
- शहरातील वाढते अपघात
- नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांचा फिटनेस
- रेती माफियांच्या टोळ्या