‘वेलकम मिस्टर पी.एम.’
By admin | Published: April 14, 2017 02:56 AM2017-04-14T02:56:23+5:302017-04-14T02:56:23+5:30
देशाला संविधानाच्या माध्यमातून सन्मान प्राप्त करुन देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी ...
नागपूरला आणा ‘अच्छे दिन’
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी,
देशाला संविधानाच्या माध्यमातून सन्मान प्राप्त करुन देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी तुमचे नागपूरला आगमन होणार आहे. तसे नागपूर तुमच्यासाठी काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार होत असताना नागपुरातूनच तुमच्यावर संस्कार झाले. येथील अनेक स्वयंसेवकांसोबत तुमचे सलोख्याचे संबंध राहिले असून महाल, रेशीमबाग येथील रस्त्यांवर सामान्य व्यक्ती म्हणून आपण वावरले आहात. पंतप्रधान झाल्यानंतर तुमचा हा तिसरा नागपूर दौरा. देशात सत्ताबदल झाल्यापासून जनतेच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दीक्षाभूमी, संघभूमी आणि देशाचे केंद्रस्थान असलेली नागपूर नगरी विकासाची नवी झेप घेण्यासाठी तयार होत आहे. मात्र तरीदेखील सर्वार्थाने नागपूरचा विकास करायचा असेल तर केंद्रपातळीवरुन ठोस हालचाली होण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा व आत्ताच झालेल्या मनपा निवडणुकांतदेखील तुमच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिलेदारांवर जनतेने विश्वास टाकला. सहाजिकच त्यांच्या विकासासंदर्भात अपेक्षा आहेत व त्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी ही त्यांची इच्छा आहे. देशभरातील विकासकामांवर आपली बारीक नजर असते. त्यामुळेच नागपूरच्या विकासाला गती मिळावी या उद्देशाने व या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूरकर जनतेच्या अपेक्षा तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा पत्रप्रपंच.
आपण सर्वात अगोदर दीक्षाभूमीला भेट देणार आहात. दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाच्या स्तरावर विकास करण्यात येणार आहे. मात्र यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील जागा मिळाली तर लाखो अनुयायांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन आपले प्रशासन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत नागपूरसाठी अनेक मोठ्या घोषणा झाल्या. मेट्रो रेल्वेचे कामदेखील सुरू झाले. मात्र अद्यापही शहरात हवी तशी गुंतवणूक आलेली नाही. कुठल्याही शहराचा विकास हा तेथे येणाऱ्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो. ‘मिहान’ला अद्यापही जागतिक दर्जाच्या कंपन्यांची प्रतीक्षाच आहे. जागा घेऊनदेखील कंपन्यांनी उत्पादनासाठी पावले उचललेली नाही. ‘सेझ’मध्ये असलेले कायदे शिथिल होण्याची कंपन्या प्रतीक्षा करीत आहेत. देशातील सत्ताबदलानंतर शैक्षणिक क्षेत्रात नागपूरला निश्चितच ‘अच्छे दिन’ आले. ‘आयआयएम’, ‘ट्रिपल आयटी’ यांची सुरुवातदेखील झाली. मात्र अद्यापही या दोन्ही राष्ट्रीय पातळीवर संस्थांच्या इमारतींचे बांधकामदेखील सुरु झालेले नाही. मध्य भारतात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा व शिक्षण मिळावे यासाठी केंद्राने ‘एम्स’ला मान्यता दिली. मात्र तीन वर्षे होऊनदेखील सरकारी अनास्थेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. हेच का वेगवान प्रशासन असा प्रश्न जनतेच्या मनात उत्पन्न होत आहे.
दुसरीकडे गोरगरिबांना दर्जेदार औषधोपचार मिलावे यासाठी ‘पॅरामेडिकल’ केंद्र, ‘रिजनल जेरियाट्रिक सेंटर’, ‘स्टेट स्पाईनल इंज्युरी सेंटर’, ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र प्रस्तावांना अद्याप केंद्राकडून हिरवी झेंडी मिळालेली नाही. ‘नीरी’, पर्यटन क्षेत्रांनादेखील केंद्राच्या ‘बूस्टर’ची आवश्यकता आहे. ‘नीरी’चा तर केंद्राच्या अनेक पर्यावरणाशी निगडित प्रकल्पांत मौलिक सहभाग आहे. ‘नमामि गंगे’ या मोहिमेच्या माध्यमातून आपण पवित्र गंगा नदीला स्वच्छ करण्याचे शिवधनुष्य उचलले. नागपुरातील नागनदी ही एकेकाळी शहराची ओळख होती. मात्र आज या नदीची दयनीय झाली आहे. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी १२०० कोटींची आवश्यकता आहे. मात्र पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरदेखील आठ महिन्यांपासून ‘फाईल’ पुढे सरकलेली नाही.
नरेंद्र मोदीजी, नागपूरसाठी अनेक प्रकल्पांची घोषणा तर झाली आहे. आपली कार्यप्रणाली पाहता प्रशासनातील सरकारीपण दूर होईल, असे जनतेसोबत आम्हालादेखील वाटत होते.
मात्र सरकारी प्रक्रियेतील वेळखाऊपणामुळे अनेक प्रकल्प कासवगतीने सुरू आहेत. या भेटीनंतर नागपूरच्या विकासाला चालना मिळेल, यादृष्टीने केंद्रपातळीवरून पावले उचलण्यासंदर्भात आपण स्वत: पुढाकार घ्यावा, ही विनंती. संत्रानगरीत आपले मनापासून स्वागत.
धन्यवाद.
आपली
नागपूरकर जनता