नागपूर जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत गारपीटने ! हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:18 PM2019-12-30T23:18:51+5:302019-12-30T23:20:51+5:30
नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. गारपीटची शक्यता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. हवामान विभागाने नववर्षात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्बेन्स निर्माण झाला आहे. याचा प्रभाव सोमवारी मध्यरात्रीपासून दिसेल. तसेच उत्तर प्रदेश,राजस्थान येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागपूर शहर व परिसरात पावसाची शक्यता आहे. सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सरासरीच्या तुलनेत पारा खाली आला आहे. सोमवारी तापमान ६.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा सरासरीपेक्षा ६ अंश खाली असल्याने थंडीपासून दिलासा मिळाला नाही. सकाळी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता ९० टक्के नोंदविण्यात आली. त्यामुळे गेल्या २४ तासात तापमानात १.९ अंशाने वाढ झाली. परंतु कमाल तापमान दोन अंश खाली २६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.
उत्साहावर पाणी तर फिरणार नाही?
नवीन वर्षाच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी सुरू आहे. फुटाळा सोबतच सार्वजनिक स्थळे, खुले लॉक, ओपन गाडंन रेस्टारेन्ट आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. परंतु पाऊ स आला तर सर्वाच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.