नागपुरात रणजी विजेत्या विदर्भ संघाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:40 PM2018-01-03T23:40:14+5:302018-01-03T23:51:45+5:30
६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या विदर्भ संघाचे चॅम्पियन्सच्या थाटात शानदार स्वागत झाले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर :६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या विदर्भ संघाचे चॅम्पियन्सच्या थाटात शानदार स्वागत झाले.
जल्लोषपूर्ण वातावरणात चाहते आणि कुटुंबीयांनी खेळाडूंवर पुष्पवर्षाव केला तर व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी केक कापून आनंद द्विगुणित केला. ढोलताशांच्या गजरात चाहत्यांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. खेळाडूंच्या दिमाखदार स्वागताचा हा अविस्मरणीय क्षण उपस्थितांनी हृदयात साठवून ठेवला.
फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने सोमवारी इतिहास घडविताना इंदूरमध्ये फायनलमध्ये दिल्लीवर मात करीत रणजी चषक पटकावून दिला. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला. विजेत्या संघाचे बुधवारी रात्री मुंबईमार्गे रात्री ९ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
बंदचा फटका.. आगमनास विलंब
भीमा कोरेगाव घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदचा फटका विमानसेवेला बसल्यामुळे विदर्भ संघाचे नागपुरात आगमन लांबले. सायंकाळी ४.५० ला जेट एअरवेजने संघ मुंबईतून नागपुरात येणार होता, पण विमान रद्द झाल्याने अखेर रात्रीच्या गो-एअरवेजने खेळाडू येथे पोहोचले.
खेळाडू विमानतळाबाहेर येताच कर्णधार फैज फझल याने विजेता करंडक उंचावून चाहत्यांना अभिवादन केले. महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अॅड. आनंद जैस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव बी. एस. भट्टी, शरद पाध्ये, मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पारंपरिक ढोल ताशांच्या गजराचा मोह सिद्धेश नेरळला आवरणे कठीण झाले होते. त्याने चाहत्यांसोबत नाचून आनंद व्यक्त केला. यावेळी कर्णधार फैज, आदित्य सरवटे, अक्षय वाडकर आणि संजय रामास्वामी यांच्या कुटुंबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते. यानंतर खेळाडूंना ग्रीन बसमधून व्हीसीए सिव्हील लाईन्स येथे नेण्यात आले. तेथे व्हीसीए पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाने केक कापला.
मनोहर यांच्या उपस्थितीत उद्या सत्कार
विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाचा सत्कार उद्या शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता व्हीसीए सिव्हील लाईन्स येथील हिरवळीवर होणारआहे. आयसीसी अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर हे मुख्य पाहुणे राहतील. मनोहर यांच्या हस्ते खेळाडू, कोचेस आणि सपोर्ट स्टाफला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.