वेंकय्या नायडूंच्या उमेदवारीचे संघ वर्तुळातून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:05 AM2017-07-18T02:05:46+5:302017-07-18T02:05:46+5:30
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्याने संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.
संघ स्वयंसेवक रिंगणात : संघश्रेष्ठींनी दाखविला होता हिरवा कंदील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्याने संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. संघ विचारसरणी जवळून जाणणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे संघ स्वयंसेवकांनी स्वागत केले आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी संघाने कुणाचेही नाव सुचविले नव्हते. मात्र सखोल मंथनानंतर भाजपाने नायडू यांचे नाव संघश्रेष्ठींसमोर मांडले व त्याला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांना रालोआने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा रंगली होती. उपराष्ट्रपतिपदासाठी संघातर्फे कुणाचेही नाव देण्यात आले नव्हते. मात्र संबंधित व्यक्ती प्रामाणिक, सर्वमान्य, चांगल्या प्रतिमेची व संघ विचारांना जाणणारी हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. व्यापक विचारविनिमयानंतर भाजपातर्फे वेंकय्या नायडू यांचे नाव संघ पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. पक्षाने सुचवलेल्या नावाला संघाने अजिबात हरकत घेतली नाही व त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिले, अशी माहिती संघातील सूत्रांनी दिली.
संघभूमीचे संस्कार
वेंकय्या नायडू हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. अगोदर केवळ शाखेत खेळण्याच्या उद्देशाने ते संघात आले. मात्र त्यानंतर संघ विचारधारेचे त्यांच्यावर संस्कार झाले व राजकारणात ते प्रगती करत गेले. अगदी संसदेत भाषण देत असतानादेखील त्यांनी संघ स्वयंसेवक असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. नायडू यांचा नागपूरशी जवळचा संबंध राहिला आहे. स्वयंसेवक असताना, भाजपा अध्यक्ष झाल्यावर व आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अनेकदा नागपूर तसेच संघ मुख्यालयाला भेट दिली आहे. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. पेंच टप्पा चार शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगीदेखील ते आवर्जून उपस्थित होते.
‘सोशल मीडिया’वर आनंद
दरम्यान, संघ स्वयंसेवक तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी वेंकय्या नायडू यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. ‘सोशल मीडिया’वर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.