विदर्भाच्या उपेक्षेमुळेच विणकरांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:47 AM2017-08-11T02:47:20+5:302017-08-11T02:47:49+5:30
विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. परिणामी नागपुरातील विणकर बेरोजगार झाले, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केला. गुरुवारी मोमिनपुºयातील अन्सार नगर चौकात विदर्भ राज्य आघाडीतर्फे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी हाजी वकील परवेज तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. शरफुद्दीन साहिल, अॅड. खलिक अंजर, अनिल जवादे, बाबू हिफजुर्रहमान, कार्यक्रमाचे संयोजक फहीम अन्सारी, डॉ. रमजान अन्सारी, अकील अहमद उपस्थित होते. अणे पुढे म्हणाले, नागपूर परिसरात दर्जेदार कापसाचे उत्पन्न व्हायचे. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने कापसाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कोलकाता ते नागपूर अशी रेल्वे लाईन टाकली. त्याकाळात नागपुरातील विणकरांची स्थिती चांगली होती. परंतु पुढे विदर्भाचा महाराष्ट्रात विलय झाला आणि चित्र बदलत गेले. नागपूरला वगळून इचलकरंजीला कापड निर्मितीचे केंद्र बनविण्यात आले.
परिणामी नागपुरातून हा व्यवसायच संपुष्टात आला. विदर्भाचा महाराष्ट्रात विलय करताना अनेक प्रस्तावांवर करार झाले होते. त्या करारातंर्गत विदर्भाच्या लोकसंख्येच्या आधारावर विकास निधी, नोकरीत वाटा देण्याचे ठरले होते. परंतु आज नागपूर आणि अमरावती मिळून फक्त अडीच टक्केच नोकºया दिल्या गेल्या आहेत. तर एकट्या पुण्याच्या वाट्याला ५० टक्के नोकºया आल्या आहेत. अशा स्थितीत वेगळा विदर्भ न होणे हा जनतेसोबत अन्याय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.