चांगली जडणघडण होईल तेथेच मुलाचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:07 AM2021-03-01T04:07:58+5:302021-03-01T04:07:58+5:30
नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच ...
नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, त्या मुलाचा ताबा दत्तक घेणाऱ्या पालकांकडेच कायम ठेवण्यात आला.
न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ॲड. नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. दोन कुटुंबातील वादामुळे लग्न होऊनही एकत्र राहू न शकलेल्या अनवर व हसीना (बदललेली नावे) या दाम्पत्याने ३० ऑगस्ट २०१४ रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर हसीना मुलाला घेऊन माहेरी गेली. मुलाला कावीळ झाला होता. त्याची प्रकृती खालावली होती. हसीनाच्या पालकांकडे त्या मुलावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तसेच, हसीनाची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे त्या मुलाला तो पाच दिवसाचा असताना सधन व सुसंस्कृत अन्सारी दाम्पत्याने दत्तक घेतले. त्या मुलावर अडीच लाख रुपये खर्च करून चांगल्या रुग्णालयात उपचार केले. तो मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. दरम्यान, अनवर व हसीनाने दत्तक करार अवैध असल्याचा दावा करून, त्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलाचे सर्वांगीण हित लक्षात घेता ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही विविध बाबी लक्षात घेता, कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील खारीज केले. अन्सारी दाम्पत्याच्या वतीने ॲड. मसुद शरीफ व ॲड. आदिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले.
---------------
-तर मुलावर मानसिक आघात
मुलाची जडणघडण अत्यंत चांगल्या वातावरणात होत आहे. मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. त्याने अन्सारी दाम्पत्याला स्वत:चे माता-पिता मानले आहे. त्याचे मानसिक व भावनिक धागे अन्सारी दाम्पत्यासोबत घट्ट बांधले गेले आहेत. अन्सारी दाम्पत्य मुलाला सर्व बाबतीत सर्वोत्तम जीवन प्रदान करण्यास सक्षम आहेत. मुलाचे त्यांच्यासोबत राहण्यातच कल्याण आहे. जन्मदात्याकडे ताबा दिल्यास मुलावर प्रचंड मानसिक आघात होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले. अनवरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याचे घर टिनाचे आहे. त्याला दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या दोन मुली शाळेत जात नाहीत. हसीनावर मानसिक उपचार सुरू आहेत. अन्सारी दाम्पत्याकडे मुलाचा ताबा कायम ठेवताना या बाबीही विचारात घेण्यात आल्या.