बहुचर्चित खुनी हल्ल्यातील करण-अर्जून परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:03 PM2017-12-30T14:03:33+5:302017-12-30T14:06:03+5:30
प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपात फरार असलेले असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून या दोन्ही मुलांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपात फरार असलेले असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून या दोन्ही मुलांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजनी चौक, चुनाभट्टी परिसरात राहणा-या मुन्ना यादव यांच्या शेजारी मंगल यादवचे घर आहे. मुन्ना आणि मंगलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शत्रूत्व आहे. त्यांच्यात नेहमीच वादविवाद हाणामा-या होत राहतात. दिवाळी दरम्यान भाउबिजेच्या दिवशी फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून पुन्हा या दोन गटात वाद झाला. त्यानंतर मुन्ना आणि मंगलचे साथीदार एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी तलवार, रॉड आणि काठ्यांनी हल्ला चढवला. या हल्लयात दोन्ही गटातील आरोपींना जबर जखमा झाल्या. मात्र, मंगल यादवला गंभीर दुखापत झाली होती. धंतोली पोलिसांनी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्याने पोलिसांनी मुन्ना यादव, त्यांची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव त्यांची करण आणि अर्जून ही दोन्ही मुले तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी गटातील मंगल यादव, पापा यादव आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमविणे, प्राणघातक हल्ला चढवणे आदी आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोन्ही गटातील आरोपी फरार आहे. दरम्यान, लक्ष्मी यादव आणि अवधेश यादव या दोघांना अटकपूर्व जामिन मिळाला. तर, अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर, करण आणि अर्जून यादव या दोघांनी शनिवारी सकाळी धंतोली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.