शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक

By admin | Published: September 12, 2016 02:42 AM2016-09-12T02:42:59+5:302016-09-12T02:42:59+5:30

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखण्यात आली. परंतु विकास होत असताना शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असते.

Well planned management of urbanization is necessary | शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक

शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक

Next

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखण्यात आली. परंतु विकास होत असताना शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असते. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता भविष्याची गरज लक्षात घेता ग्रामीण भागासोबतच शहरांच्या विकासालादेखील प्राधान्य देण्याची गरज आहे. शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारातून नागपूर महापालिका व नासुप्रशी संबंधित प्रश्नांवर रविवारी ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या परिषदेचे कामठी रोडवरील ‘ईडन ग्रीन्झ’ येथे आयोजन करण्यात आले. या वेळी उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री व उत्पादन शुल्क मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा.डॉ. विकास महात्मे, खा.अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ.कृष्णा खोपडे, आ.सुधाकर देशमुख,आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, आ.प्रकाश गजभिये, आ.जोगेंद्र कवाडे, आ.विकास कुंभारे, पोलीस आयुक्त के.वेंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विश्वराज समुहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक तसेच ‘ओसीडब्ल्यू’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी, पूनम रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक एन.कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या तसाभराच्या भाषणात नागपूरच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. माध्यमांनी केवळ प्रश्न मांडून होत नाही. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. तेव्हाच लोकशाहीचा खरा विकास होतो.‘लोकमत’ने या महाचर्चेच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे व हे स्वागतार्ह आहे. शहरांमध्ये रोजगारानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परंतु त्या दृष्टीने आवश्यक नियोजन नसल्यामुळे झोपडपट्टी व अनधिकृत बांधकामांची समस्या निर्माण होते. त्यामुळे या दिशेने योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही ‘महाचर्चा’ आयोजित करण्यात आली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अरुण लखानी व एन. कुमार यांचेही विजय दर्डा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
लोकमततर्फे नागपूर शहराचे प्रश्न व विकासावर तयार करण्यात आलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, महापौर प्रवीण दटके, अरुण लखानी यांनीदेखील मत मांडले. संचालन सहायक संपादक गजानन जानभोर यांनी केले. महाचर्चेला उद्योगपती मनोज जयस्वाल, माजी आमदार एस.क्यु. जमा, अशोक मानकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक देवेंद्र वानखेडे, बसपाचे प्रसिद्धी प्रमुख उत्तम शेवडे, प्रा. रजनीकांत बोंदरे, नगरसेविका चेतना टांक, निता ठाकरे, रश्मी फडणवीस, संगीता गिऱ्हे, दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, बाल्या बोरकर, नगरसेवक गुड्डू तिवारी, गौतम पाटील, जयप्रकाश गुप्ता, चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, डॉ. पिनाक दंदे, प्रमोद पेंडके, डॉ. विलास मूर्ती, श्रीकांत आगलावे, ज्ञानेश्वर रक्षक, ओसीडब्ल्युचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर, भाजयुमोच्या शहर अध्यक्ष शिवाणी दाणी, रणजितसिंह बघेल, विभागीय माहिती संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, प्रा. धर्मेश धवनकर, जेष्ठ पत्रकार रघुनाथ पांडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, बांधकाम व नगर रचना क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी रेड एफएम ९३.५, जेमिनी गो ग्रीन व वर्षा आऊटडोअर, संदीप प्रो साऊंड, यश एलईडी, विशाल लाईट यांचे सहकार्य लाभले.

नागपूर देशातील आदर्श शहर करणार : नितीन गडकरी
नागपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर झाले पाहिजे हे आपले स्वप्न आहे. त्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. नागपूरसाठी आतापर्यंत मी एकट्यानेच ३० हजार कोटी रुपये खेचून आणले आहेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.गडकरी यांनी नागपुरात होत असलेल्या विकास कामांची विस्तृत माहिती दिली. त्यासोबतच, महानगरपालिकेच्या कार्यशैलीवर ताशेरेही ओढले. नागपुरात ५० हजार रोजगारांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. शहर आता झपाट्याने बदलत आहे. नागपूरकरांच्या आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा असून अजून बरीच कामे करायची बाकी आहेत. वेळ कमी असल्यामुळे कामाचा वेग वाढवावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले. नागनदीच्या योजनाबद्ध विकासासाठी १ हजार १२० कोटी रुपयांचा प्रकल्प वित्तीय समितीसमोर सादर करण्यात आला असून नागनदी शहराच्या सौंदर्यात भर पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गडकरी यांनी यावेळी भ्रष्टाचारावर प्रहार केला. भ्रष्टाचारामुळे विकासाची गती मंदावते. भ्रष्टाचार समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर कुणी भ्रष्टाचाराची तक्रार करीत असेल तर, त्याचे नाव जाहीर करू नका. महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील प्रकरणांवर तत्काळ निर्णय घ्यावेत. कायद्यानुसार काम होत नसेल तर प्रकरण परत करावे, अशी समज त्यांनी दिली.

शाश्वत विकासावर भर हवा : विजय दर्डा
प्रत्येक शहराची स्वत:ची वेगळी ओळख असते. परंतु बहुतांश ठिकाणी समस्या सारख्याच असतात. शासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ची चर्चा होत असताना शाश्वत विकासावर जास्त भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. नागपुरात झोपडपट्टी, खड्डे, अस्वच्छता या समस्या आहेत. अनधिकृत बांधकाम व ‘पार्किंग’ची समस्यादेखील मोठे रूप घेते आहे. त्यामुळे या सर्व समस्यांवर वेळीच उपाय शोधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Well planned management of urbanization is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.