आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा! उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:59 PM2020-04-20T23:59:56+5:302020-04-21T00:01:59+5:30
कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.
भटक्या जमातीच्या पालात राहणाऱ्या लोकांपर्यंत संघर्षवाहिनी व दीनबंधू संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचले. तेव्हा या लोकांनी घेरून आम्हालाही धान्य द्या हो, आमच्या घरीही अन्न नाही, पाहिजे तर तुम्ही घरी या, शोधा घरात, अन्न असेल तर नका देऊ, अशा रडवेल्या चेहऱ्यांनी विनवणी केली.
या लोकांकडे येथील रेशनकार्ड नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांविना जगणारी ही माणसे चिलापिलांसह येथे थांबली आहेत. इथले नगरसेवक आपापल्या क्षेत्रातील त्यांच्या व्होटरपर्यंत धान्याच्या किट्स कशा पोहोचतील, याचा कसोसीने प्रयत्न करीत आहेत. जे त्यांचे व्होटर्स नाहीत त्यांच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. नगरसेवकाला धान्याची मागणी करायला गेल्यावर त्यांचे उत्तर असते, ‘कार्ड दाखवा, धान्य घ्या’. या लोकांसाठी हा देश त्यांचा आहे, असे म्हणण्यापुरताच आहे. कारण हे राज्य त्यांच्यासाठी परके झालेले आहे.
जिथे भूक आहे तिथे अन्न नाही!
संघर्षवाहिनी या भुकेलेल्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. संघटनेजवळ होते नव्हते तेवढे त्यांच्या झोळीतही टाकले. पण शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भोजनदान सुरू आहे. नगरसेवकांच्या घरून धान्याच्या किट्स वाटल्या जात आहेत. अनेकजण अनावश्यक धान्य गोळा करून ठेवत आहे. काहीजण शिजलेले अन्नही नाकारत आहे. पण जिथे भूक आहे, तिथे अन्न पोहचत नसेल, तर शोकांतिका आहे.