मतदानासाठी रामटेकला गेले अन चोरट्यांनी घर फोडले
By योगेश पांडे | Published: April 23, 2024 03:58 PM2024-04-23T15:58:31+5:302024-04-23T15:59:15+5:30
Nagpur : मतदानासाठी रामटेकला गेले आणि घरातून २.६० लाखांचा मुद्देमाल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण कुटुंब रामटेकला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत २.६० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नितीन वासुदेव चोले (४२, सर्वश्रीनगर, दिघोरी) हे मुंबईतील एका कंपनीत वरिष्ठ डिजिटल ॲनालिस्ट म्हणून नागपुरातून वर्क फ्रॉम होम करतात. त्यांचे मतदान केंद्र रामटेकला असल्यामुळे १९ एप्रिल रोजी ते कुटुंबियांसह पहाटे रामटेकला गेले. सोमवारी सकाळी परतले असता त्यांच्या घराचे कुलूप तुटले होते. चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने,दोन लॅपटॉप, हार्डडिस्क, तीन घड्याळी, दुचाकीचे आरसी बुक, पॅन कार्ड व रोख ३० हजार असा २.६० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोले यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.