बहिणीच्या घरी गेले, चोरट्याने ८.१९ लाखाची रोख, दागिने नेले
By दयानंद पाईकराव | Published: June 19, 2023 02:44 PM2023-06-19T14:44:04+5:302023-06-19T14:50:31+5:30
८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी
नागपूर : घराला कुलुप लाऊन बहिणीकडे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख आणि दागिने असा एकुण ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरी केला. ही घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी १८ जूनला सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली.
स्वप्निल सुरेश मरजिवे (वय ४०, रा. न्यु सुभेदार ले आऊट, सक्करदरा) असे फिर्यादीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ते आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह बहिणीच्या घरी गेले होते. थोड्या वेळाने त्यांची पत्नी घरी परतली असता तिने घराचे कुलुप उघडून आत प्रवेश केला. यावेळी हॉलमध्ये लाकडी दिवाणमधील सामान त्यांना अस्ताव्यस्थ पडलेले दिसले.
शंका आल्यामुळे त्यांनी स्टोअर्समधील लाकडी कपाट बघितले असता ते उघडे दिसले. त्यानंतर त्यांनी आपले पती स्वप्निल यांना फोन करून घरी बोलावले. त्यांनी तपासणी केली असता १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ६ लाख ३० हजार असा एकुण ८ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याचे त्यांना समजले. अज्ञात आरोपीने घराच्या मागील दाराची कडी तोडून आत प्रवेश करून मुद्देमाल चोरी केल्याचे त्यांना समजले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सागर अरबट यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.