कस्तूरचंद पार्क संवर्धनाच्या निर्देशांचे पालन झाले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:21+5:302020-11-27T04:04:21+5:30
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदान, तेथील स्मारक व अन्य बांधकामाचे संवर्धन करण्यासंदर्भात वेळोवेळी देण्यात ...
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदान, तेथील स्मारक व अन्य बांधकामाचे संवर्धन करण्यासंदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन झाले काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांना यावर येत्या २३ डिसेंबरपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्यास सांगितले.
यासंदर्भात न्यायालयात २०१७ पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन ही याचिका स्वत: दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांच्या वकिलांनी आतापर्यंत न्यायालयाच्या अनेक निर्देशांची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, उर्वरित निर्देशांचे लवकरच पालन होईल अशी ग्वाही दिली. परंतु, न्यायालयाने त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता निर्देशांचे खरेच पालन झाले किंवा नाही याची पडताळणी करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. तसेच, याकरिता ॲड. श्रीरंग भांडारकर यांना संबंधित अधिकारी व वकिलांसोबत कस्तूरचंद पार्कला प्रत्यक्ष भेट देण्यास आणि परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
------------------
तक्ता स्वरूपात मागितली माहिती
ॲड. भांडारकर यांना न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीवर तक्ता स्वरूपात माहिती सादर करायची आहे. न्यायालयाने कोणत्या तारखेला निर्देश दिले होते, त्याचे पालन कोणत्या तारखेला करण्यात आले, निर्देशाचे पूर्णपणे पालन करण्यात आले काय, कोणत्या निर्देशांचे पालन झाले नाही इत्यादीची स्वतंत्र माहिती अहवालात असावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.