सहकाराच्या माध्यमातून ‘वेस्ट टू वेल्थ’ शक्य
By admin | Published: February 29, 2016 02:55 AM2016-02-29T02:55:28+5:302016-02-29T02:55:28+5:30
टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे,...
नितीन गडकरींचे यांचे प्रतिपादन : सहकार भारतीच्या अधिवेशनाचा समारोप
नागपूर : टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सहकारी भारतीच्या विदर्भ शाखेतर्फे रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय अधिवेशनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे व विदर्भ शाखेचे अध्यक्ष केशव दांडेकर उपस्थित होते. गडकरी यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘वेस्ट टू वेल्थ’चे महत्त्व पटवून सांगितले.
केसांपासून शेती उपयोगी अॅमिनो अॅसिड तर, शौचालयाच्या पाण्यापासून सीएनजी वायू तयार करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी गाईचे महत्त्वही समजावून सांगितले. गोमूत्र प्राशन केल्यामुळे तब्येत ठणठणीत राहते. गाईच्या तुपाला मोठी मागणी आहे. देशी गाई पाळण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. राजस्थानातील साहिवाल व गीर या गाईपासून जन्मलेल्या बैलाचे वीर्य वापरून महाराष्ट्रातील देशी गाई दुधाळू करता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
रामदेवबाबा गडचिरोली, अमरावती व नागपूर येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व्हावे व त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविली जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.