पाश्चिमात्य खाद्य आरोग्य व देशासाठी घातक
By Admin | Published: October 3, 2016 03:04 AM2016-10-03T03:04:12+5:302016-10-03T03:04:12+5:30
सुरेख इंग्रजी नाव असलेले पाश्चिमात्य पॅकेज्ड फूडचे आकर्षण सध्या नागरिकांमध्ये वाढत आहे.
रुजुता दिवेकर : परिसंवादात दिल्या योग्य आहाराच्या टीप्स
नागपूर : सुरेख इंग्रजी नाव असलेले पाश्चिमात्य पॅकेज्ड फूडचे आकर्षण सध्या नागरिकांमध्ये वाढत आहे. परंतु असे खाद्य आपले आरोग्य व आपला देश दोन्हीसाठी घातक आहेत, असे विचार प्रसिद्ध आहार व पोषण विशेषतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी मांडले. रविवारी चिटणवीस सेंटर येथे आयोजित परिसंवादात आहारविषयक माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, उपाध्याय ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अरुण उपाध्याय, सेंटर पॉर्इंट ग्रुप आॅफ स्कूल्सच्या चेअरमन अरुणा उपाध्याय व प्रा. रेखा दिवेकर उपस्थित होत्या.
कोशिश फाऊंडेशनतर्फे भोजन आणि योग्य आहारावर अनेक पुस्तके लिहिणाऱ्या रुजुता दिवेकर पुढे म्हणाल्या, आपले स्वदेशी खाद्य आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. हे खाद्य पर्यावरणपूरक, स्थानिक व्यावसायिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे आहे. त्यामुळे पॅकेज्ड फूड खाण्यापेक्षा आपल्या सभोवताल तयार होणाऱ्या स्वदेशी खाद्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे. एअर फ्राइडच्याऐवजी डीप फ्राइड तथा पॅकेज्ड बिस्किटच्याऐवजी पटकन शिजवले जाणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. हेच आपल्या आरोग्याच्या हिताचे आहे. पॅकेज्ड फूडमुळे प्रदूषण वाढत आहे, हे टाळता आले पाहिजे. फॅट कमी करण्यासाठी साबुदाणा खिचडी हा चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष सलिल देशमुख यांनी तर संचालन डॉ. नेहा शर्र्मा यांनी केले. (प्रतिनिधी)
चॉकलेट गिफ्टपेक्षा मोदक, करंजी उत्तम
आपल्या स्वदेशी खाद्यपदार्थांना आपण फार महत्त्व देत नाही. पण, त्यातच अनेक पोषक तत्त्व असतात. आमच्या येथे तयार होणारी साखरही मोठी ऊर्जा देत असते. परंतु साखरेचे काही विदेशी प्रकार अपायकारक असतात. अशी साखर न वापरता उसापासून तयार होणारी साखरच उपयोगात आणली पाहिजे. उसाचा रसही खूप लाभदायक आहे. उसाचा रस ‘डीटोक्साइजर’ विषरोधी कार्य करतो. म्हणूनच कावीळ झाल्यावर डॉक्टर रुग्णांना उसाचा रस पिण्याचा सल्ला देत असतात. आजकाल चॉकलेट गिफ्टचा ट्रेंड सुरू आहे. पण, यापेक्षा आमचे शंकरपाळे,मोदक, लाडू, करंजी जास्त रुचकर आणि आरोग्यदायक आहेत. शिवाय अशा पदार्थ्यांच्या निर्मितीचे कार्य महिला बचत गटांनाही दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना रोजगाराचा एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने शरीर सुद्ढ होते. मांसाहार करणाऱ्यांनी नवरात्र, श्रावण अशा सणांच्या काळात हे वर्ज्य केले पाहिजे. भारतीयांचे अनुकरण करीत आता अमेरिकेतील लोकही ‘नो मीट मंडे’ ही संकल्पना राबवत आहेत, याकडेही रुजुता दिवेकर यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले.