नागपुरात ओला कचरा, सुका कचरा’ विलगीकरणाला हरताळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:04 AM2020-05-23T01:04:50+5:302020-05-23T01:11:24+5:30
शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मात्र, आता कचरा घेण्यास येणाऱ्या स्वच्छता दूतांकडूनच या प्रक्रियेला हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मात्र, आता कचरा घेण्यास येणाऱ्या स्वच्छता दूतांकडूनच या प्रक्रियेला हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘टाकाऊ पदार्थ ही सर्वोत्तम गुंतवणूक (वेस्ट यूज फॉर बेस्ट)’ ही संकल्पना वेळोवेळी आपल्या जाहीर भाषणांतून बोलून दाखवली. कचऱ्यातून वीजनिर्मिती आणि इतर अनेक उपक्रम राबविण्यात येऊ शकतात, यावर त्यांचा जोर आहे. त्याच हेतूने कचरा विलगीकरणाची प्रक्रिया थेट घरातूनच व्हावी आणि याची नागरिकांना सवय लागावी या हेतूने नागपूर महानगर पालिकेने ‘ओला कचरा, सुका कचरा’ अशी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने वगळता नागरिक आता स्वत:च दोन प्रकारचा कचरा दोन बकेटमध्ये साठवून ठेवतात आणि मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती दररोज सोपवत आहेत. महापालिकेच्या गाड्यांमध्येही ओला व सुका कचºयाचे दोन भाग पाडण्यात येऊन त्याना हिरवा व निळा रंग देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिक ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाण्याचे स्वर कानावर पडताच घरातून कचऱ्याच्या दोन बकेट घेऊन दारावर पोहोचतात आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेत बराच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नागरिक ओला व सुका कचऱ्याच्या दोन बकेट स्वच्छता कर्मचाऱ्यांना देत असले तरी कर्मचारी मात्र कचऱ्यामध्ये विलगीकरण करत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन बकेट एकाच ठिकाणी रिकाम्या केल्या जात आहेत. जर एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात असेल तर मग ओला व सुका कचरा असा फरक नागरिकांनाच का करायला सांगितल्या जात आहे, असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण व्हायला लागला आहे.
कचरा संकलन गाड्या मोडकळीस!
गेले दोन वर्षे ही प्रक्रिया योग्य तऱ्हेने पार पाडत असताना कचरा संकलन करणाºया गाड्यांची स्थितीच मोडकळीस आल्याचे दिसून येते. ओला व सुका असे एकाच गाडीत दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, गाडीचे दोन भाग करणारी मधली टिनेची भिंतच तुटली असल्याने कचरा संकलन करताना दोन्ही प्रकारचा कचरा मिसळत आहे. शिवाय, गाडीला स्वतंत्रपणे दोन वेगळ्या मोठ्या बकेट्स आहेत. मात्र, एका भागातील संपूर्ण कचरा त्यात सामावला जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवरून कर्मचाºयांनी सांगितले.
गती कशी मिळणार?
सुरुवातीला शहराच्या काठावर असलेल्या भांडेवाडी येथे कचºयाचे भले मोठे ढीग निर्माण झाले आहे. आता हे ठिकाण शहरात आले आहे. कचºयाचा उपयोग करता आला तर अशा ढिगाऱ्यापासून शहराला मुक्ती मिळेल, या हेतूने ओला व सुका कचरा स्विकारण्याची पद्धत अमलात आली. घरातूनच असे विलगीकरण झाले तर शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि गती वाढेल, हा हेतू त्या मागचा आहे. मात्र, गाड्यांच्या अव्यवस्थेमुळे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे पुन्हा कचरा संकलनाची ही पद्धत मोडकळीस आल्याचे दिसून येते.