सुविधांचे काय करू, आम्हाला घरी जायचेय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:57 PM2020-05-04T21:57:46+5:302020-05-04T22:24:36+5:30
मोतिहारीचे छुट्टन पासवान असो की आंध्र प्रदेशातील व्यंकटेशम किंवा ओडिशाचे प्रेमलाल. सर्वच आपापल्या घरी जाण्यासाठी आतूर आहेत. हे त्या ६५,६७४ मजुरांपैकी आहेत जे गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकल्यानंतर जिल्ह्यातील निवारा केंद्रांमध्ये शरण घेऊन आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोतिहारीचे छुट्टन पासवान असो की आंध्र प्रदेशातील व्यंकटेशम किंवा ओडिशाचे प्रेमलाल. सर्वच आपापल्या घरी जाण्यासाठी आतूर आहेत. हे त्या ६५,६७४ मजुरांपैकी आहेत जे गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकल्यानंतर जिल्ह्यातील निवारा केंद्रांमध्ये शरण घेऊन आहेत. शासनातर्फे त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांची आतूरता आणखी वाढली आहे. ते म्हणतात, शेल्टर होममध्ये खाण्याची आणि राहण्याची चांगली व्यवस्था होत आहे. परंतु आता त्यांचे मन लागत नाही. त्यांना लवकारत लवकर आपल्या घरी जायचे आहे. सर्वांची ही एकच इच्छा असूनफ त्या सर्वांच्या आवाजातही दु:ख ऐकू येते. ‘घरी सर्व चिंतेत आहेत, सरकार मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पाठवत आहे, परंतु त्यांचा नंबर कधी येणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
देशातील वेगवेगळ्या राज्यातून रोजगारासाठी आलेले मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. कुणी पायी चालून आपल्या घरी जायला निघाले होते. परंतु प्रशासनाने अशा मजुरंना रोखले. शेल्टर होम तयार करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. आता त्यांची घरी जाण्याची तयारी सुरू झाली आहे. सरकार विशेष रेल्वेगाडी व बसेस चालवून त्यांना आपापल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करीत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने नागपुरातील विविध ठिकाणच्या शेल्टर होमची पाहणी करून श्रमिकांची परिस्थिती जाणून घेतली.
रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे लोकमतच्या चमूने भेट दिली असता दोन मोठ्या सभागृहात मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेर पोलीस तैनात होते. भवनात प्रवेश करताच केअरटेकर प्रदीप उईके व ए.एल. सरकार यांची भेट झाली. त्यांनी सांगितले की, २८ मार्चपासून मजूर येथे राहत आहेत. दोन दिवसापूर्वीपर्यंत १५१ मजूर होते. आता ३७ राहिले आहेत. उर्वरित आपल्या घरी रवाना झाले आहेत. आज सोमवारी दुपारी १ वाजता छिंदवाड्यातील १४ मजुरांना घेऊन बस रवाना झाली. सध्या येथे झारखंडचा १, आंध्र प्रदेशचे ३, ओडिशाचे २ व मध्य प्रदेशातील ३१ मजूर राहिले आहेत.
दुसरीकडे या निवारा केंद्रातून ११४ मजूर घरी परत गेल्यानंतर उर्वरित मजुरांची आतूरता वाढली आहे. त्यांनी लोकमतला सांगितले की, त्यांना आता त्यांचा नंबर कधी येईल, याची प्रतीक्षा आहे. सीताबर्डी येथील बेघर निवारा केंद्रात एकूण ३५ लोक राहत आहेत. परंतु यात केवळ एकच स्थलांतरित मजूर आहे. उर्वरित हे नागपुरातीलच बेघर आहेत. येथील एकमेव मजूर पाटणा येथील रहिवासी असून त्यालाही त्याचा नंबर कधी लागेल, याची प्रतीक्षा आहे.
मास्क बनवण्याचे प्रशिक्षण, योगा क्लासेसही
मजुरांसाठी बनवण्यात आलेल्या अग्रसेन भवनातील शेल्टर होममध्ये योगा क्लासेससुद्धा होत आहेत. यासोबतच त्यांना प्लायवूडपासून घरटे बनवणे आणि इतर कामांचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. मजुरांमधील निराशा दूर करण्यासाठी त्यांचे कौन्सिलिंगही केले जात आहे. महिला मजुरांना मास्क बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचा चहा-नाश्ता व जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मजुरांना घरी जातानासुद्धा सॅनिटायझर, साबण व खाद्यसामुग्री दिली जात आहे.
स्थलांतरित मजुरांची संख्या
नागपूर निवारा केंद्र मजुरांची संख्या
नागपूर शहर २७५ ४९,११३
नागपूर ग्रामीण ५ १६,५६१
---------------------------------------------
२८० ६५,६७४
‘घर वापसी’ची गती कमी, प्रशासनही लाचार
जिल्हा प्रशासनाच्या आकड्यानुसार नागपुरातील एकूण २८० शेल्टर होममध्ये ६५,६७४ स्थलांतरित मजूर आहेत. आतापर्यंत केवळ ९७७ लोकांनाच त्यांच्या घरी विशेष रेल्वेने पाठवण्यात आले आहे. जर घरी पाठवण्याची गती अशीच राहिली तर सर्वांनाच घरी पोहोचवण्यासाठी किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेची व्यवस्था झाल्यावरच त्यांना पाठवले जात आहे. परंतु अनेकांना बसनेसुद्धा पाठवण्यात आलेले आहे. परंतु त्यांची आकडेवारी मात्र सध्या तरी प्रशासनाकडे नाही.