उपाध्यक्ष पदाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:14+5:302021-03-10T04:08:14+5:30
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सदस्यांचे सदस्यत्व सोमवारी रद्द केले. या सदस्यांमध्ये जि. प.च्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षांकडे बांधकाम ...
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सदस्यांचे सदस्यत्व सोमवारी रद्द केले. या सदस्यांमध्ये जि. प.च्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य सभापती अशी तीन पदे आहेत. त्या पदांचे अधिकार हस्तांतरित करायचे की पूर्णत: रद्दबातल करायचे, यावरून स्पष्टता नसल्याने जिल्हा परिषदेने त्यासंदर्भात मार्गदर्शन मागितले आहे.
प्रशासनासमोर अशा प्रकारचा प्रसंग पहिल्यादांच उद्भवल्याने नेमका काय निर्णय घ्यायचा, याबाबत पेच होता. मंगळवारी शासनाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. विद्यमान उपाध्यक्षपद हे मनोहर कुंभारे यांच्याकडे आहे, तसेच पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून आरोग्य समिती आणि बांधकाम समितीचे सभापतिपदही त्यांच्याच वाटेला गेले आहे़ अशा स्थितीत सदस्यत्व रद्द झाले असले तरी या तिन्ही पदांबाबत काय निर्णय घ्यावा, याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झाल्याने शासनाला मार्गदर्शन मागविण्यात आल्याचा दुजोरा अतिरिक्त सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनीही दिला आहे. जाणकारांच्या मते, उपाध्यक्षपदाचे अधिकार अध्यक्षांकडे हस्तांतरित करून ते पद कायम ठेवता येईल़ बहुधा, जिल्हा परिषदेतील अध्यक्षांवर अपात्रता किंवा गंभीर आरोप सिद्ध झाल्यास अध्यक्षांचे अधिकार व पद उपाध्यक्षांकडे हस्तांतरित झाल्याची उदाहरणे आहे़ मात्र, उपाध्यक्षांचे सदस्यत्व रद्द झाल्यास ते अध्यक्षांकडे येते की नाही, याबाबत प्रशासनात संभ्रम आहे़ असे न झाल्यास उपाध्यक्ष पदासह त्यांची संपूर्ण आस्थापना प्रशासकीय कामकाजातूनच वगळावी लागणार असल्याचे सांगण्यात येते़ या सर्व बाबी शासनाच्या मार्गदर्शनानंतर शेवटाला जाईल.