जप्त केलेल्या तूरडाळीचे काय?
By Admin | Published: March 28, 2016 03:10 AM2016-03-28T03:10:33+5:302016-03-28T03:10:33+5:30
तुरीच्या डाळीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेऊन, साठेबाजांवर कारवाई करण्यात आली. यात अन्न पुरवठा
नागपूर : तुरीच्या डाळीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेऊन, साठेबाजांवर कारवाई करण्यात आली. यात अन्न पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात तूर जप्त केली. प्रशासनाने हीच तूर भरडा करून डाळीच्या स्वरूपात १०० रुपयांत विकण्याची अट व्यापाऱ्यांना टाकली. परंतु व्यापाऱ्यांना ते परवडणारे नसल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे आजही जप्त केलेली तूर गोदामात पडली आहे. तिची उचल न झाल्यामुळे खराब होत असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात तीन व्यापाऱ्यांकडून ७६८ क्विंटल तूर जप्त करण्यात आली होती. तुरीची भरडाई करून १०० रुपयांत डाळ विक्री करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांकडून १००० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते. यातील एका व्यापाऱ्यांनी ८४ क्विंटल डाळ विकल्याची माहिती आहे. परंतु उर्वरित दोन व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विभागाने त्यांना डाळीची उचल करण्यास नोटीस बजावल्या. परंतु त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अद्यापही जप्त केलेली तूर गोदामात पडून आहे.
दिवाळीच्या काळात डाळींच्या किमतीचा भडका उडाला होता. डाळींचे दर आटोक्यात आणण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त साठा केलेल्या व्यापाऱ्यांच्या गोदामावर छापे टाकण्यात आले.
डाळींचे साठ जप्त करण्यात आले. मात्र व्यापारी भाव कमी करायला तयार झाले नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी जप्त केलेली डाळ परतच नेली नाही.
शासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाने साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करता त्यांच्या माध्यमातूनच डाळीची विक्री करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयाला व्यापाऱ्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दोन व्यापाऱ्यांनी डाळ विक्रीची तयारी दर्शविली नाही.
दरम्यान जप्त डाळीचा लिलाव करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. परंतु लिलाव अद्यापही झाला नाही. अनेक महिने डाळ पडून असल्याने ती जवळपास खराब झाल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
तूरडाळ दर्जेदार नव्हतीच
हे दोन्ही व्यापारी मुंबई आणि नाशिक येथील असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या मते जप्त केलेली तूर दर्जेदार नव्हती. त्यामुळे त्यांनी कदाचित उचल केली नसेल. परंतु जप्त केलेल्या तुरीचा लिलाव करण्यात येईल.
- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी