एक वर्षीय अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:08 AM2020-06-03T11:08:27+5:302020-06-03T11:10:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात काही अभ्यासक्रम हे एका वर्षाचेच असून तेथे वार्षिक प्रणाली सुरू आहे. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कशाच्या आधारावर होणार व त्यांना श्रेणी कोणत्या मापदंडानुसार देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षादेखील रद्द करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अगोदरच्या सत्रांतील कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येणार आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात काही अभ्यासक्रम हे एका वर्षाचेच असून तेथे वार्षिक प्रणाली सुरू आहे. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कशाच्या आधारावर होणार व त्यांना श्रेणी कोणत्या मापदंडानुसार देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनातदेखील संभ्रम असून राज्य शासनाकडूनदेखील भूमिका स्पष्ट झालेली नाही.
अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेसंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून याचा विरोधदेखील होत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांच्याच हिताचे असल्याचे दावे करण्यात येत आहेत. सर्वसाधारणत: पदवी अभ्यासक्रम हे तीन किंवा चार वर्षे व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे असतात. परंतु नागपूर विद्यापीठात काही पदव्युत्तर अभ्यासक्रम हे एकाच वर्षाचे आहेत. या अभ्यासक्रमांत सत्र प्रणाली लागू नाही. तेथे थेट वार्षिक प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पदवी देत असताना त्यांना श्रेणी कशाच्या आधारावर द्यावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने ‘अप्लाईड बॉटनी’, ‘सेरिकल्चर’, ‘अॅग्रिकल्चर’,‘सेरिकल्चर बायोटेक्नॉलॉजी’, ‘एन्व्हायर्नमेन्टल बायोटेक्नॉलॉजी’, ‘नॅनोटेक्नॉलॉजी’, ‘बायोइन्फॉर्मेटिक्स’, ‘सायबर लॉ’, ‘लेबर लॉ’, ‘फॅशन टेक्नॉलॉजी’मधील पदव्युत्तर पदविका, ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ यासारख्या पदव्यांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचादेखील या यादीत समावेश आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अशा प्रकारचे सुमारे शंभर अभ्यासक्रम आहेत. यातील हजारो विद्यार्थ्यांना आपले नेमके काय होणार, ही चिंता लागली आहे.
हजेरीच्या आधारावर करणार का अंतर्गत मूल्यमापन ?
या अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत मूल्यमापन हा एक पर्याय असू शकतो असे म्हटले जात आहे. मात्र मार्च महिन्यात लॉकडाऊन झाला आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांची महाविद्यालय किंवा विभागपातळीवर एकही परीक्षा झालेली नाही. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील झाले नाहीत. अशा स्थितीत केवळ वर्गांमधील हजेरीच्या आधारावर त्यांचे मूल्यमापन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता अद्याप शासनाकडून दिशानिर्देश आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक वर्षीय अभ्यासक्रमांबाबत नेमके काय करायचे हे शासन निर्देश आल्यानंतरच कळेल, असे त्यांनी सांगितले.