सोनेगाव पोलिसांविरुद्धच्या तक्रारींवर काय कारवाई केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:22+5:302021-05-11T04:08:22+5:30
नागपूर : सोनेगाव पोलिसांविरुद्ध विविध गंभीर आरोपांसह करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नागपूर : सोनेगाव पोलिसांविरुद्ध विविध गंभीर आरोपांसह करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली व यावर १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला़
यासंदर्भात अॅड. सतीश उके यांनी याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए़ हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ १२ जून २०१४ रोजी सोनेगाव परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता़ सोनेगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कायद्यानुसार तपास केला नाही, असा उके यांचा आरोप आहे़ संबंधित मृतदेह एका उत्तर भारतीय मुलीचा होता़ २०१२ मध्ये आरोपींनी त्या मुलीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते़ त्यानंतर एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करण्यात आले़ त्याविषयी बाहेर वाच्यता होऊ नये याकरिता त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्यासाठी सोनेगाव परिसरातील गटारात टाकण्यात आला असे उके यांचे म्हणणे आहे़ यासंदर्भात १३ मार्च २०२० रोजी पोलीस आयुक्तांना आणि ६ नोव्हेंबर २०२० रोजी गृहमंत्र्यांना तक्रार दिली होती, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असाही उके यांचा आरोप आहे़