‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:48 AM2020-10-20T10:48:13+5:302020-10-20T10:48:44+5:30
Fake News Nagpur News नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात ‘सोशल मीडिया’वर ‘फेक न्यूज’चे प्रमाण वाढलेले दिसून येते. मात्र प्रशासकीय नोंदींमध्ये अद्यापही हे प्रमाण नगण्यच आहे. नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे नेमके कुणाचे आकडे खरे व कुणाकडून ‘फेक’ माहिती देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांच्या नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो व असे करणाऱ्यांविरोधात कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो.
नागपूर पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले. परंतु ‘एनसीआरबी’च्या २०१७, २०१८ व २०१९ सालच्या अहवालात मात्र या गुन्ह्यांचा आकडा शून्य दाखविण्यात आला आहे. अशा स्थितीत माहितीचा अधिकार खरा की ‘एनसीआरबी’ची माहिती, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारवाईचे प्रमाण कधी वाढणार?
राज्यभरात ‘फेक न्यूज’ दिसून येत असल्या तरी यासंदर्भात कारवाईचे प्रमाण फारच कमी आहे. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत राज्यात केवळ २० गुन्हे दाखल झाले. ‘फेक न्यूज’विरोधात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.