पावसाचा रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्ट म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 05:42 PM2023-07-06T17:42:53+5:302023-07-06T17:43:20+5:30

Nagpur News भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी (Alert) चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज (Orange), ग्रीन (Green), यलो (Yellow) आणि रेड (Red) अशा रंगाचा वापर होतो.

What are red, orange, yellow and green rain alerts? |  पावसाचा रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्ट म्हणजे काय?

 पावसाचा रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्ट म्हणजे काय?

googlenewsNext

  सुनील चरपे

 नागपूरः भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी (Alert) चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज (Orange), ग्रीन (Green), यलो (Yellow) आणि रेड (Red) अशा रंगाचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात? त्यांचा अर्थ काय?

  रेड अलर्ट 
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी (Heavy Rain) किंवा ढगफुटीचा (Cloud burst) अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासह तत्सम  नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जाताे. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते. विशिष्ट भागातील प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात. जसं की सध्या हवामान विभाग राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करते. त्या भागांमधील नागरिक आणि प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे संकेत दिले जातात. एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो. म्हणजेच त्या जिल्ह्यात बहुतांश भागात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पावसाचा पाऊस (Heavy Rain) पडू शकतो किंवा पावसाची तीव्रता जास्त असू शकते. प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असला तरी संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला असतो.

 ऑरेंज अलर्ट 
मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) म्हणजे आपत्तीची येऊ शकते. नागरिक व प्रशासन सतर्क असावे यासाठी  हवामान खात्याकडून हा अलर्ट दिला जाताे. ऑरेंज अलर्टचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. म्हणजेच त्या जिल्ह्यातील काही केंद्रांवर अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडू शकतो.

  यलो अलर्ट 
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी शक्यता निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून अनेक शहरांना येल्लो अलर्ट (Yellow Alert) दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम हाेण्याची शक्यता असल्याने सर्वांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी तुरळक केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट दिला जातो. तूरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो.

  ग्रीन अलर्ट 
पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट (Green Alert) असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परिस्थिती सामान्य असेल, त्यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

 अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजे काय?
अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज म्हणजे त्या जिल्ह्यात 24 तासांत 204.4 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा होणार आहे. या प्रमाणात देशात खुपच कमी ठिकाणी पाऊस होतो. हवामान विभाग इंग्रजीमध्ये ‘एक्सट्रीमली हेवी’ (Extremely heavy Rain) अशी संज्ञा वापरते.

  अति जोरदार पाऊस म्हणजे?
अति जोरदार पाऊस म्हणजे 115.6 ते 204.4 मिलिमीटर पाऊस. ज्या भागात या दरम्यान पाऊस झाला किंवा होणार आहे, तेथे हवामान विभाग अति जोरदार पावसाची अंदाज देते. हवामान विभाग अंदाज देताना (Very Heavy Rain) अशी शक्यता वर्तविते.

  जोरदार पाऊस म्हणजे काय?
अंदाज देताना जोरदार पाऊस (Heavy Rain) असा उल्लेख हवामान विभागाद्वारे केला जातो. एखाद्या भागात 64.5 ते 115.5 मिलिमीटर पावसाची शक्यता असेल, तर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग देते. एखाद्या भागात 15.6 ते 64.4 मिलिमीटर पावसाची शक्यता असेल तर हवामान विभाग मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करते. अंदाज देताना हवामान विभाग मध्यम पाऊस (Moderate rain) असा उल्लेख  करते. 15.6 मिलिमीटरपेक्षा कमी असल्यास त्याला हलका पाऊस असे संबाेधले जाते.

 

Web Title: What are red, orange, yellow and green rain alerts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस