यालाच हिंदू धर्म म्हणायचा का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:00 PM2018-07-14T23:00:59+5:302018-07-15T01:19:03+5:30
सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.
ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चासत्र शनिवारी धनवटे सभागृह शंकरनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अ.भा. बौद्धिक प्रमुख मा.गो. वैद्य, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ प्रमुख अतिथी होते.
देशात २६ कोटी अल्पसंख्याक राहतात. यांच काय करणार ? हिंदू राष्ट्राच्या पुरस्कर्त्यांकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. धर्मनिरपेक्ष हे केवळ मूल्य नसून ते आपले धोरण आहे, असेही द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी मा.गो. वैद्य म्हणाले ‘ हिंदू राष्ट्र स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्र म्हणजे लोकसत्ता होय. आपल्या भूमीवर प्रेम असणे, त्याचा एक इतिहास आणि एक जीवनमूल्य या तीन अटी राष्ट्रासाठी लागतात.रिलीजन हा धर्माचा एक भाग आहे. पूर्ण धर्म नव्हे. धर्म एक व्यापक संकल्पना आहे. संपूर्ण मानवाशी जोडणारा तो मानवधर्म होय.
रवींद्र रुक्मिनी पंढरीनाथ यांनी ‘आरएसएसला कोणता हिंदू धर्म हवा आहे? दाभोळकरांचा की गोडसेचा? असा प्रश्न उपस्थित केला.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, वैचारिक वाद नवीन नाहीत. ते चालत राहतील. पण एकसंघ हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही. झालेच तर २५-३० वेगवेगळे राष्ट्र होतील.
प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले. संचालन अतुल विडुळकर यांनी केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.