काय सांगू भाऊ, घर चालवायले जिगर लागते नं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:55 AM2020-11-04T10:55:35+5:302020-11-04T10:58:02+5:30
corona Nagpur News ऑटोचेच रूपांतरण सायकल रिपेअरिंग सेंटरमध्ये केले. पाना, पेंचिस उचलला, एअर मशीन घेतली आणि काही टायरट्यूब खरेदी करून ऑटोतच दुकान थाटले.
राजेश टिकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल’ अशा आशेवर जगणाऱ्यांचे सध्याचे दिवस आहेत. कोरोना संक्रमण अन् त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने अनेकांच्या स्वप्नांचा बळी गेला आहे. मात्र, तरीही ते हरले नाहीत, थकले नाहीत. येणाऱ्या काळाशी, आलेल्या संकटाशी सामना करत, मेंदू शाबूत ठेवून, हात बळकट करत जिगराने लढा देत आहेत. अशाच एका ऑटोचालकाचा सामना झाला तर तो म्हणतो... ‘काय सांगू भाऊ, घर चालवायले जिगर लागते नं.’
आयुष्याचे ५० उन्हाळे-पावसाळे बघणारे प्रदीप तुप्ते टाळेेबदीत हतबल झाले नाहीत. ऑटो चालवून बायको, पोरासह आनंदी होते. अर्थात आताही आहेत. मात्र, या आनंदात टाळेबंदीचे विरजण पडले आणि पुढे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. टाळेबंदीची सुरुवातीची पाच महिने ऑटोची चाके थांबली होती. त्यामुळे आनंदी संसाराचा रहाटगाडा चालविण्यासाठी मिळेल ते काम केले. मात्र, अनिश्चित मिळकत आणखी किती दिवस, हा प्रश्न होता. अनलॉक प्रक्रियेत ऑटो सुरू झाले तरी संसर्गाच्या भीतीने प्रवासी मिळेनात. परिस्थितीपुढे हतबल व्हायचे की नेटाने सामना करायचा, असा प्रश्न पडला. मात्र सामना करायचाच, असा ठाम निर्धार झाल्यावर जुना सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय करायचे ठरले. आधीच पैसा नाही अन् दुकान भाड्याने घेतले तर किमान भाडे तरी निघेल काय, असा नवा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे ऑटोचेच रूपांतरण सायकल रिपेअरिंग सेंटरमध्ये केले. पाना, पेंचिस उचलला, एअर मशीन घेतली आणि काही टायरट्यूब खरेदी करून ऑटोतच दुकान थाटले. जिगर बळकट असली की मार्ग सापडतोच, ही म्हण त्यांनी वास्तवात उतरवून दाखवली. गेल्या आठवडाभरापासून पिपळा रोडवर त्यांचे हे दुकान चालते. खूप नाही पण कुणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही, याची त्यांना हमी आहे.
कुटुंबाचेच नामकरण ‘सुपर’
पत्नीचे नाव सुषमा, स्वत:चे नाव प्रदीप आणि मुलाचे नाव राहुल. दुकानाचे नाव काय ठेवायचे तर तिघांच्या नावाच्या इंग्रजी अक्षरांचे मिळून ‘सुपर’ हे नाव निश्चित झाले. ऑटोमधील सुपर सायकल रिपेअरिंग सेंटर आता हळहळू लोकांच्या नजरेत भरत आहे.