शिक्षण समितीने निकष कशासाठी बदलले?
By Admin | Published: June 25, 2015 02:58 AM2015-06-25T02:58:10+5:302015-06-25T02:58:10+5:30
ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सायकल वाटप केले जाते.
सायकल खरेदीचा घोळ : वादात अडकले वाटप
नागपूर : ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सायकल वाटप केले जाते. परंतु शिक्षण समितीने प्रचलित पद्धतीला फाटा देत एकाच साहित्याच्या दोन वेगवगेळ्या निविदा काढण्याचा अफलातून निर्णय घेतला. संशय निर्माण झाल्याने प्रचलित निकष कशासाठी बदलविण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समितीच्या सदस्यांना या निर्णयाची माहिती होऊ नये यासाठी सदस्य उपस्थित असूनही मुद्दामच सभापती अनुपस्थित होते. ही बैठक तहकूब करून सदस्य निघून गेल्यानंतर घेण्यात आली. यात सायकल व गणवेश पुरवठ्याबाबतचे निकष बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सायकल खरेदी करताना आजवर मुले व मुली असा फरक करण्यात आला नव्हता. एकत्रित निविदा काढण्याची प्रचलित पद्धत होती. परंतु एकत्रित खरेदी एक कोटीची असल्याने यासाठी सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार होती. याला फाटा देण्यासाठी वेगवेगळ्या दोन निविदा काढण्यात आल्याचा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला आहे.
बाजारभावानुसार ३६०० रुपये दराने २७०० सायकली खरेदी करावयाच्या आहेत. मोठी खरेदी असल्याने या रकमेत चांगल्या दर्जाच्या सायकली मिळू शकतात. परंतु उत्पादक वा मोठा पुरवठादार नसलेल्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी सभापतींनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून पुरवठा देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
हा प्रकार शिक्षण समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्याने समितीच्या सदस्यात वाद निर्माण झाला आहे. यात काँग्रेसच्याही काही सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याचे पडसाद २९ जूनला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)