सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचे काय?
By admin | Published: April 14, 2015 02:12 AM2015-04-14T02:12:20+5:302015-04-14T02:12:20+5:30
मुख्यमंत्र्यांच्या होम टाऊनमधील पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अशा तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या
उपराजधानीत बॅकलॉग : नवीन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायमच
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
मुख्यमंत्र्यांच्या होम टाऊनमधील पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अशा तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, त्यांच्या जागेवर तूर्त केवळ आयुक्तच रुजू होतील. सहआयुक्त रुजू व्हायला किमान एक महिना वाट बघावी लागेल. तर, अतिरिक्त आयुक्त कधी येणार, अन् कोण येणार, ते स्पष्ट नाही. त्यामुळे गृहखात्याचीही जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ‘बॅकलॉग’ आणि उफाळलेल्या गुन्हेगारीचा विषय आणखी तसाच ‘गरम’ राहणार आहे.
तीन जाणार, एकच येणार!
आज जारी झालेल्या यादीनुसार, पोलीस आयुक्त के.के. पाठक पुण्याला आयुक्त म्हणून बदलून जात आहेत. तर, येथे नवे आयुक्त म्हणून सीआयडीचे प्रमुख एस.पी. यादव येणार आहेत. सहआयुक्त अनुपकुमार यांच्या जागेवर मुंबईहून आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त राजवर्धन येणार आहेत. मात्र, ते दीड महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले आहेत. त्यामुळे ते येथे १६ मेनंतरच रुजू होतील. तिसरे महत्त्वपूर्ण अधिकारी म्हणजे अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांची बदली मुंबईला मानवाधिकार आयोगाच्या उपमहानिरीक्षकपदी झाली. मात्र, त्यांच्या रिक्त जागी येथे कोण येतील, हे स्पष्ट नाही. अर्थात तीन प्रमुख पोलीस अधिकारी बदलून जाणार असले तरी आयुक्तांच्या रूपात एकमात्र यादवच येथे लवकर रुजू होतील. सहआयुक्तांना एक महिना उशीर आहे. तर, अतिरिक्त आयुक्त कधी येणार, ते गुलदस्त्यात आहे.
मुंबई, पुण्यातील पोलीस अधिकारी विदर्भातच काय, नागपुरातही येण्यासाठी तयार नसतात. त्यांची बदली झाली तरी त्यातील अनेक जण इकडे रुजूच होत नाहीत. यापूर्वीच्या सरकारात हा विषय प्रत्येक बदलीच्या वेळी चर्चेला यायचा. आता सरकार बदलले.
उपराजधानीचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. गृहखातेही त्यांच्याकडेच असल्यामुळे नागपूर विदर्भातील ‘पुलिसिंगला’ चांगले दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली.
सध्या मुख्यमंत्र्यांच्या होम टाऊनमध्ये गुन्हेगारी उफाळल्याची सर्वत्र प्रचंड ओरड आहे. ‘जेल ब्रेक’मुळे तर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेचेच वाभाडे निघाले आहे. त्यामुळे उपराजधानीत जेवढी पदे आहेत तेवढे नव्या दमाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने नियुक्त केले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु आज जारी झालेल्या बदलीच्या यादीनंतर ती फोल ठरली.
गुन्हे शाखेला आयुक्त नाहीच!
विशेष म्हणजे, पोलीस दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपद दीड ते दोन वर्षांपासून रिक्त आहे. येथे रवींद्र कदम (अॅडिशनल सीपी क्राईम) यांच्यानंतर पूर्णवेळ अधिकारीच आलेला नाही.
महत्त्वाचे अन् संवेदनशील पद असल्यामुळे ती जबाबदारी आधी संजय सक्सेना यांनी सांभाळली. त्यांच्या बदलीनंतर सहआयुक्त अनुपकुमार यांनी हा अतिरिक्त पदभार सांभाळला. आता अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. ‘डीसीपी इमिग्रेशन’ हे पदसुद्धा रिक्त आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपुरात गुन्हेगारीही तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जेवढी मंजूर पदे आहेत, तेवढे किमान अधिकारी असावेत, अशी अपेक्षा आहे. यापूर्वीच्या सरकारात ती कधीच पूर्ण झाली नाही. मात्र, आता मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन बनल्यानंतरही येथे अशीच स्थिती आहे.