त्या बालकांचे काय चुकले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:33+5:302021-08-17T04:12:33+5:30
नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. ...
नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. पण या मुलांना शाळेने दाखल करून घेतले नाही. एकीकडे कुणीही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी मोहीम राबविण्यात येते. अशात ७४ बालके शोधूनही शाळेत दाखल केले नाही, या बालकांचे काय चुकले, असा सवाल बालरक्षकांनी केला आहे.
पटसंख्येच्या अभावी सरकारी शाळा बंद पडत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालके शाळाबाह्य आहेत. कालडोंगरी परिसरातील बेड्यावरील ७४ मुले बालरक्षक प्रसेनजित गायकवाड आणि माधुरी सेलोकर यांनी महिनाभर प्रयत्न करून शोधली आणि त्यांच्या जन्माच्या नोंदींसह यादी रामा जोगराणा यांच्याकरवी केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत कालडोंगरी जि.प. प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यासाठी दिली. मागील महिन्यात मुलांना आणि पालकांना प्रवेशासाठी शाळेत उपस्थित केले. त्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी मुलांना शाळेत दाखल करीत असल्याचे नाटक केले. परंतु दुसरेच दिवशी गावातील पालक विरोध करीत असल्याचे सांगून, सदर मुलांना शाळेत प्रवेश देता येणार नसल्याचे सांगितले.
मुलांना शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात स्थानिक पालकांना काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी बालरक्षक गायकवाड यांनी समन्वय सभा घेऊन पालक, शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांना शाळाबाह्य मुलांच्या शाळाप्रवेशाची कायदेशीर बाजू समजावून सांगितली. या मुलांना तात्काळ प्रवेश देण्यासाठी विनंती केली. लगेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. शिक्षणाधिकारी यांनी लगेच पत्र काढून गटशिक्षणाधिकारी यांना सूचित केले. तथापि, अजूनही या शाळाबाह्य मुलांचा शाळाप्रवेश झाला नाही.
- आरटीईच्या कायद्यानुसार एकही मूल शाळाबाह्य राहू नये. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी कार्य करणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या परिसरातील शाळाबाह्य मुले शोधून त्यांना तात्काळ प्रवेश देणे गरजेचे आहे. कुणाच्या दबावात मुख्याध्यापक या मुलांना प्रवेश देत नसेल तर शिक्षण विभागाने अशा मुख्याध्यापकांचे प्रबोधन करावे. त्यांचे कार्य समजवून सांगावे.
प्रसेनजित गायकवाड, बालरक्षक
- आम्ही मुलांना शाळेपर्यंत घेऊन गेलो. त्यांच्या जन्मतारखेचे दाखले मुख्याध्यापकांना दिले. पण मुलांना प्रवेशित करून घेतले नाही. या मुलांनाही शैक्षणिक सोयी-सवलती मिळाव्यात, त्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ, गणवेश, पुस्तके मिळावेत, ही मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, अशी आमची अपेक्षा आहे.
रामा जोगराणा, सामाजिक कार्यकर्ते