काय रे पोरा, होईल का शक्य... होय बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:33 AM2020-03-16T10:33:55+5:302020-03-16T10:34:19+5:30
आरामखुर्चीवर बसून बाबानी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’
आनंद डेकाटे/निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मदीक्षेचा सोहळा निश्चित झाला होता आणि रेवाराम कवाडे व वामनराव गोडबोले यांनी याबाबत चर्चेसाठी बाबांच्या सांगण्यावरून मला बोलावून घेतले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अतिशय उत्साहात मी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेबांच्या २४, अलीपूर रोडवरील निवासस्थानी पोहचतो. काही वेळातच एका हातात काठी व नानकचंद रत्तू यांचा आधार घेत बाबासाहेब बाहेर आले. पहिलीच भेट आणि त्यांचे ते धीरोदात्त रूप पाहून मी भारावून गेलो होतो. आरामखुर्चीवर बसून त्यांनी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’
जेमतेम २८ वर्षे वय असलेले सदानंद फुलझेले त्यावेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते आणि साहजिकच समाजाचा एक तरुण नेता म्हणून या धम्मदीक्षा सोहळ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. यासंदर्भाने महामानवाशी झालेली ही पहिलीच भेट आणि या भेटीचा शब्द न् शब्द फुलझेले यांच्या हृदयावर कोरला गेला. यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांना दुरून पाहिले होते व यानंतरही अनेक भेटी झाल्या; पण या पहिल्याच भेटीतील बाबासाहेबांचे हेच शब्द त्यांच्या आयुष्यासाठी दिशादर्शक ठरले. हजारो वर्षांच्या शोषित पीडित समाजाचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर २१ वर्षे विविध धर्मांचा अभ्यास करून १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतात. या रक्तविहीन ऐतिहासिक धम्मक्रांतीचा महामेरू होणे, ही संधी नव्हे तर आयुष्याचे भाग्यच होते आणि ते तरुण सदानंद फुलझेले यांच्याकडे चालून आले होते. आज बजाजनगरच्या परिसरात धम्मदीक्षेच्या आठवणींचे जगविख्यात स्मारक उभे आहे आणि ते उभारणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रेरणादूतांपैकी सदानंद फुलझेले यांचाही सिंहाचा वाटा आहे. सोहळ्याची तारीख निश्चित झाली असली तरी त्यासाठी जागा शोधणे व कार्यक्रमाचे नियोजन करणे हे मोठे यज्ञ होते. अखिल भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर शाखेचे अध्यक्ष पं. रेवाराम कवाडे व सचिव वामनराव गोडबोले यांच्यासोबत फुलझेले यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यावेळी माताकचेरीजवळ बजाजनगरातील हीच जागा धम्मदीक्षा सोहळ्यासाठी शोधण्यात आली. बाबासाहेबांनी इतर सहकाऱ्यांशी शहानिशा केल्यानंतर याच जागेला पसंती दिली होती. यानंतर प्रत्यक्ष सोहळा, धम्मदीक्षेसाठीचे व्यासपीठ आणि लाखो लोकांच्या बसण्याची व्यवस्था शहराचे उपमहापौर म्हणून सदानंद फुलझेले यांनी अगदी नेटाने पार पाडली. अनेक अडचणींचा सामना करीत, वेगवेगळ्या प्रकारची तयारी करीत हा ऐतिहासिक सोहळा भव्य रूपात पार पडला, यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. दोनच महिन्यात डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर या प्रेरणादूतांनी बाबासाहेबांच्या विचारांचे भव्य असे स्मारक धम्मदीक्षेच्या जागेवर उभारण्याचा निर्धार केला.