मनुष्यबळच नाही तर कोविड सेंटरच करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:42+5:302021-07-22T04:07:42+5:30
भिवापूर : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र संभावित तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. त्यामुळे राज्यशासनाने ...
भिवापूर : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र संभावित तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. त्यामुळे राज्यशासनाने ‘वीकेंड लॉकडाऊन’ आणि ‘चारच्या आत बंद’ हे नियंत्रणात्मक धोरण कायम ठेवले आहे. दुसरीकडे मात्र कोविड केंअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश धडकले आहे. कर्मचारीच नसेल तर कोविड केअर सेंटरचे करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुसऱ्या लाटेत भिवापूर तालुक्यात रुग्णांचा आकडा ३ हजारांपर्यंत तर मृत्यूचा आकडा शंभरीपर्यंत पोहोचला. अनेकांनी बेड व ऑक्सिजन अभावी मृत्यूला कवटाळले. कोविड सेंटरमध्ये अल्पशा मानधनावर कर्तव्य बजावणारे कंत्राटी मनुष्यबळ दुसऱ्या लाटेत संजीवनी ठरले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणले. या लढ्यातून आता कुठे नागपूर जिल्हा सावरत आहे. अशातच आता कोविड सेंटरमधील कार्यरत कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करण्याचे आदेश मंगळवारला धडकले. यात वैद्यकीय अधिकारी, स्टोअर ऑफिसर, आरोग्य सेविकांचा समावेश आहे. बुधवारी हे सर्व कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त झाले असून कोविड सेंटरमध्ये केवळ रिकामे बेड असे दृश्य आहे. त्यामुळे मनुष्यबळच नसेल तर कोविड सेंटरचे करायचे तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. संभाव्य तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. अधेमधे रुग्णांच्या नोंदी सुरूच आहे. अशात कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून कोविड सेंटर बंद करणे चुकीचे ठरत असल्याचा आरोप होत आहे.
रुग्णाला घरी पाठवित सेंटर बंद
आंध्रप्रदेशातून शहरात आलेली एक २४ वर्षीय महिला कोविड पॉझिटिव्ह आढळली. तिला स्थानिक कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणीचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले. दरम्यान रिपोर्ट निगेटिव्ह येताच सदर रुग्णाला घरी पाठवित कोविड सेंटरचे कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त केले.
कार्यमुक्त करू नका त्यांचे वेतन आम्ही देतो
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबत वरिष्ठ व स्थानिक अधिकाऱ्यांत चर्चा झाली. यात शासनाकडे पैसे नसून कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त न केल्यास त्यांचे वेतन कोण देणार असा प्रश्न एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारला. त्यावर उत्तर देणे स्थानिकांना कठीण झाले. लागलीच कार्यमुक्तीचे आदेश धडकले त्यावर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करू नका आम्ही त्यांना वेतन देऊ. त्यासाठी शहरात भिख मांगो आंदोलन करू असे खोचक उत्तर दिले आहे. युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष हिमांशु अग्रवाल, धनंजय चौधरी, भूषन नागोसे, गजू खांदे आदी पदाधिकारी उमरेडच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले असून गुरुवारी तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.