नागपुरातील मोकाट कुत्र्यांचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:39 AM2018-07-29T01:39:30+5:302018-07-29T01:40:09+5:30
अविधेशन काळात विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने खास पथक कामाला लावले होते. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांची दहशत आहे. लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडण्याची महापालिका वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अविधेशन काळात विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने खास पथक कामाला लावले होते. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांची दहशत आहे. लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडण्याची महापालिका वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला आहे.
विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त केला जातो. त्याच धर्तीवर शहरातील अन्य भागात उपाययोजना का केल्या जात नाही. शहरात दररोज २० ते २५ लोकांना कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना घडतात. वर्षाला हा आकडा सात ते साडेसात हजारांवर जातो. यातील अनेक जण गंभीर जखमी होतात. रात्रीला वस्त्यांत मोकाट कुत्र्यांचा पहारा असतो. कामावरून घरी परतणाऱ्यांवर कुत्री धावतात. यामुळे वाहनांचा अपघात होऊन अनेक जण जखमी होतात. घरातील कमावती व्यक्ती जखमी झाली तर या कुटुंबाची जबाबदारी महापालिका घेणार आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या नगरसेवकांकडे दररोज तक्रारी येतात. महापालिकेत १५५ नगरसेवक आहेत. नगरसेवक प्रशासनानाला कळवितात. परंतु उपाययोजना होत नाही. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांची महापालिक ा जबाबदारी स्वीकारणार का असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी होण्याची गरज आहे. परंतु नावासाठी हा उपक्रम राबविला जातो. दिवसाला पाच-सात कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. शहरात ९० हजारांवर मोकाट कुत्री आहेत. याचा विचार करता दिवसाला १०० ते १५० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली तरच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकतो. मात्र मागील आठ-दहा वर्षात परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. महापालिका व पदाधिकाºयांची उदासीन भूमिका असल्याने यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.
नगरसेवकांच्या तक्रारी केराच्या टोपलीत
महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या विभागात मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव आहे. नगरसेवकांची तक्रार आल्यानतंरही मोकाट कुत्र्यांना पकडणारे पथक प्रभागात पोहचत नाही. नगरसेवकांच्या तक्रारींचीच दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे कोण ऐकणार असा प्रश्न आहे.
कंट्रोल कोण करणार ?
शहरातील नागरिक मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीत आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यांची वाढती संख्या कंट्रोल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याशिवाय कंट्रोल क ोण करणार? कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने सक्षम यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीतून कारवाई क रणे शक्य आहे. परंतु दुदैवाने उपाययोजना होताना दिसत नाही.
तानाजी वनवे, विरोधीपक्षनेते महापालिका
तर उत्तर प्रदेशच्या घटनेची पुनरावृत्ती होईल
उत्तर प्रदेशात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान बालकाचा बळी गेला. नागपूर शहरातही अशीच परिस्थिती आहे. गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. लहानमुलांना चावा घेण्याच्या घटना वाढत आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. उत्तर प्रदेश सारखी घटना घडल्यावर महापालिकेला जाग येणार आहे का. अधिवेशन काळात विधानसभन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. त्याच धर्तीवर शहरात बंदोबस्त का केला जात नाही.
संदीप सहारे, नगरसेवक
तक्रार करूनही पथक येत नाही
कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या दररोज तक्रारी येतात. महापालिके च्या कोंडवाडा विभागाला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना आम्ही नगरसेवक करतो. परंतु तक्रार करूनही अनेकदा पथक येत नाही. आले तरी कुत्रे पकडण्यासाठी आवश्यक असलेली साधने त्यांच्याकडे नाहीत. काहीवेळा पथकातील कर्मचाºयांना कुत्रा चावतो. त्यांच्या उपचाराची जबाबदारी महापालिका घेत नाही. लहानमुले व महिलात कुत्र्यांची दहशत आहे. प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आभा पांडे, नगरसेवक
कुत्रे व डुकरांचा धुमाकूळ
उत्तर नागपुरात मोकाट कुत्रे व डुकरांनी धुमाकूळ घातला आहे. याची नागरिकांत दहशत आहे. तक्रार केली तरी उपाययोजना होत नाही. प्रशासन यासंदर्भात गंभीर नाही. परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होणार नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी महापालिकेने ठोस उपाय योजण्याची गरज आहे.
जितेंद्र घोडेस्वार, नगरसेवक