नागपुरात वीज बिल जास्त का?
By Admin | Published: July 24, 2016 02:15 AM2016-07-24T02:15:22+5:302016-07-24T02:15:22+5:30
विद्युत बिलामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
भाजपा कार्यकर्त्यांचा एसएनडीएलला घेराव : ऊर्जामंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर समाधान
नागपूर : विद्युत बिलामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र वारंवार तक्रार करूनही वीज कंपनीकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. विजेचे बिल मुंबईत कमी आहे, मात्र नागपुरात ते अधिक का,असा सवाल करीत पूर्व नागपूर भाजपा कार्यकर्त्यांनी एसएनडीएलच्या वर्धमाननगर येथील कार्यालयात तीव्र आंदोलन करून अधिकाऱ्यांना घेराव घातला. आमदार कृष्णा खोपडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
आ. कृष्णा खोपडे यांनी यावेळी सांगितले की, नागपुरातील नागरिकांना मुंबईपेक्षा ८ ते १० पटीने अधिक बिल भरावे लागते. विदर्भात वीज तयार होत असताना नागपूरवर अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला महावितरणकडून वीज खरेदी करावी लागते.
उलट मुंबईमध्ये टाटा व रिलायन्स या फ्रेंचायसींचे स्वत:चे वीजनिर्मिती केंद्र असून, त्यांच्याकडूनच वीज पुरविली जात असल्याने स्वस्त मिळत असल्याचे सांगितले. कृष्णा खोपडे यांनी एसएनडीएलशी करार करणाऱ्या काँग्रेसवर टीका करीत नागपूरकरांवरील वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी समाधानकारक मार्ग काढावा, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालय बंद पाडून त्यासमोर नारेबाजी केली. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धमाननगर चौकात वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. शेवटी एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलावल्यानंतर आंदोलक शांत झाले. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना समजावत, पूर्वीच्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने एसएनडीएलशी २०२६ पर्यंतचा करार केला असल्याने, विद्यमान सरकारला हा करार रद्द करणे शक्य नसल्याची असमर्थता दर्शविली. नागरिकांच्या समस्या लक्षात घेता वर्धमाननगर कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा, असे निर्देश त्यांनी एसएनडीएलला दिले. नागरिकांच्या तक्रारींचे समाधान झाले की नाही, हे पाहण्यासाठी महिनाभरानंतर पाहणी करण्याचा भरवसा त्यांनी दिला.
या आंदोलनात भाजपा पूर्व नागपूरचे अध्यक्ष महेंद्र राऊत, महामंत्री संजय अवचट, सेतराम सेलोकर, देवेंद्र काटोलकर, महेंद्र गुप्ता, बाळा विटाळकर, नगरसेवक देवेंद्र मेहर, मनीषा कोठे, प्रदीप पोहाणे, कांता रारोकर, अनिल धवडे, बाल्या बोरकर, व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष संजय वाधवानी, अ.जा. मोर्चाचे धर्मपाल मेश्राम, बाल्या रारोकर, सचिन करारे, निशा भोयर, आनंदराव जाधव, सुभाष कोटेचा, सुनील सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)