नागपुरात कोरोनाचा उद्रेक झालाच तर? १८३ लोकांमागे एकच खाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:29 AM2020-03-18T10:29:53+5:302020-03-18T10:30:11+5:30
सध्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दुर्दैवाने उद्रेक झाल्यास धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे, हा प्रश्न आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर वाढत आहे. सध्या नागपूरची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी व डागासह खासगी इस्पितळांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या १४ हजार २०७ आहे. त्यानुसार १८३ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण येत आहे. उपलब्ध खाटांपैकी बहुसंख्य खाटा विविध आजारांच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दुर्दैवाने उद्रेक झाल्यास धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे, हा प्रश्न आहे.
शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. या शिवाय, मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमिळून २२५०, मेयोमध्ये ७५०, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ५५० व खासगी इस्पितळेमिळून १० हजार ५२७ आहेत. यांची बेरीज केल्यास ही संख्या १४ हजार २०७ वर जाते. १८३ लोकामागे फक्त एक खाट हे प्रमाण योग्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मेयो, मेडिकलमध्ये यापेक्षा खाटा वाढणे अशक्यच
सध्या शहरात कोरोना विषाणूचे चारच रुग्ण असलेतरी रोज सुमारे २०वर संशयित रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांसाठी मेयोमध्ये २० तर मेडिकलमध्ये ४० खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मेडिकल आणखी ३० खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून देणार आहे. परंतु त्यांच्यावर इतरही रुग्णांचा भार असल्याने त्यांना मर्यादा येणार आहेत. मेयोमध्ये तर ब्रिटिशकालीन जुन्या सर्व इमारती पाडण्याचा सूचना आहेत, त्यामुळे त्यांनाही खाटा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे वास्तव आहे.