शहरात चालले काय... परत आढळले पिस्तुल
By योगेश पांडे | Published: February 28, 2024 05:57 PM2024-02-28T17:57:23+5:302024-02-28T17:58:22+5:30
सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना सलीम स्पोर्टस ग्राऊंडच्या मागे मोकळ्या जागेत एक जण संशयास्पद अवस्थेत दिसला.
नागपूर : उपराजधानीत मागील वर्षी शस्त्रविक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते व त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र मागील आठवड्यात तीन वेळा पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पिस्तुल व काडतुसे आढळली आहे. बुधवारी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुल आढळले.
सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना सलीम स्पोर्टस ग्राऊंडच्या मागे मोकळ्या जागेत एक जण संशयास्पद अवस्थेत दिसला. मोहम्मद नदीम उर्फ शानू मलिक मोहम्मद फरीद मलिक (२८, आशीनगर, पाचपावली) असे त्याचे नाव होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तुल व मॅगझीन आढळले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मागील पाच दिवसांत शहरात पिस्तुल आढळण्याची ही तिसरी घटना आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेमन सभागृहाजवळ एका व्यक्तीकडे पिस्तुल सापडले होते. तर व्यापाऱ्यांना लुटण्याच्या हेतूने मध्यप्रदेशातून नागपुरात आलेल्या आरोपीकडेदेखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुल सापडले होते.