मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:53+5:302021-06-06T04:06:53+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध शिथिल करून दुपारी २ वाजेपर्यंत ...

What happened as the mobile broke down; Don't let your health deteriorate! | मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!

Next

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध शिथिल करून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. दुकाने सुरू झाल्याने नागरिक मोबाइलची खरेदी आणि दुरुस्तीसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोबाइल दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे; पण मोबाइल विक्रेते आणि दुरुस्ती करणारे दुकानदार कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून खबरदारी घेत आहेत. ग्राहकांसाठी काउंटरवर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रुग्णांची वाढती संख्या बघता राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व वर्गवारीतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. जवळपास दोन महिने दुकाने बंद राहिली. नियम आणि अटींतर्गत १ जूनपासून दुकाने सुरू झाली असून, आता सर्वच दुकानांमध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत. मोबाइल खरेदी, दुरुस्ती आणि अ‍ॅक्सेसरीज खरेदीसाठी नागरिकांची दुकानांत गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणी मुलाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी नवीन मोबाइलची खरेदी, तर अनेक जण बिघाड झालेला मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानात येत आहेत. मोबाइल दुकानदारही दुकानात गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आहेत. नियम पाळताना दुकानात एकाच वेळी एकाच ग्राहकाला मास्क घालून परवानगी देण्यात येत आहे.

कारण काय :

- मोबाइलची बॅटरी बदलण्यासाठी

- चार्जिंग सॉकेट खराब झाले

- स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी

- नवा मोबाइल घेण्यासाठी

- मोबाइल हँग होत असल्यामुळे

- मोबाइलचा आवाज नीट ऐकू येत नाही

- मोबाइलचा डिस्प्ले बदलून घेणे

बॉक्स :

दोन महिन्यांपासून दुकाने बंद

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास दोन महिन्यांपासून मोबाइलची दुकाने बंद होती. आता १ जूनपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती आणि नवीन मोबाइल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासोबत नियमांचे पालन करण्याच्या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसला आहे.

दुकानदारांच्या प्रतिक्रिया .....

व्यवसाय ठप्प झाल्याने नुकसान

कठोर निर्बंधांमुळे मागील दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकानेही बंद होती. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्यवसाय होत आहे. सर्व सुरळीत होण्यास अद्यापही बराच विलंब लागणार आहे.

-सतीश सावजी, मोबाइल विक्रेते

व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार

दुकाने सुरू झाल्याने मोबाइल दुरुस्तीची कामे आता मिळत आहेत. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. ग्राहक दुकानात येत नसल्याने दोन महिन्यांपासून घरीच होतो. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दुकाने बंद होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

-प्रशांत जैन, मोबाइल दुरुस्ती

ग्राहकांच्या प्रतिक्रिया...

सध्या वर्क फ्रॉम होम होत असल्याने चांगल्या दर्जाचा मोबाइल घेतला होता; पण आवाज स्पष्ट येत नसल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो आहे. याशिवाय स्क्रीन गार्डही लावायचा आहे. दोन महिन्यांपासून दुरुस्तीची वाट पाहत होतो.

-अनुज जोशी, ग्राहक

मुलाचे १४ जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू होत आहे. त्यासाठी नवीन मोबाइल विकत घेत आहे. शिवाय जुना मोबाइल हँग होत असल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो आहे. मास्क व सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करीत आहे.

-राजेंद्र सपाटे, ग्राहक

Web Title: What happened as the mobile broke down; Don't let your health deteriorate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.