फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल
By निशांत वानखेडे | Published: March 10, 2024 06:44 PM2024-03-10T18:44:52+5:302024-03-10T18:45:23+5:30
दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेला आता दाेन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परीक्षा रद्द करून याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली हाेती. मात्र दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फेलाेशीपसाठी एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांचे रणकंदन अजुनही सुरुच आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर यासाठी तिन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून आंदाेलन चालले आहे. मात्र सरकारकडून याबाबत काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राेष तयार हाेत आहे. फेलाेशीप पात्रतेसाठी १० जानेवारी २०२४ राेजी परीक्षा घेण्यात आली हाेती. राज्यातील ४ केंद्रांपैकी नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी २ सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ए आणि बी सेट हे सीलबंद हाेते, तर उर्वरित सी आणि डी हे लीक हाेते. शिवाय त्यांना स्टेपलर केलेल्या पिन आढळून आल्या. त्यामुळे पेपरफुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला.
विशेष म्हणजे महाज्याेतीने यापूर्वी निर्धारीत केलेली परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली हाेती. अशा प्रकारामुळे महाज्याेतीच्या भाेंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र राेष पसरला आहे. धक्कादायक म्हणजे बार्टीचे पीएचडी पात्रताधारक २०२२ पासून आणि सारथी व महाज्याेतीचे पात्रताधारक २०२३ पासून फेलाेशीप मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली पण दाेन महिने लाेटूनही या कमिटीचा अहवाल आला नाही की सरकारकडून कुठला निर्णय हाेत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारकडून काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
अशात लवकरच लाेकसभेच्या व त्यानंतर राज्याच्या निवडणुका ताेंडावर येऊ घातल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागली की या विषयावर पुन्हा तीन महिने कुठलाही निर्णय हाेण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढत चालली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही
विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे. शासन जर वारंवार अशा चुका करीत असून ते किती गंभीर आहेत हे लक्षात येतं. शासनाने पात्रता परीक्षेचा ससेमिरा थांबवून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहे.