देशभक्तांचा हा द्वेष कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:32 AM2017-11-10T01:32:11+5:302017-11-10T01:32:41+5:30

रा. कृ. पाटील कोण होते ? भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेला हे कदाचित ठावूक नसावे.

 What is the hatred of patriots? | देशभक्तांचा हा द्वेष कशासाठी?

देशभक्तांचा हा द्वेष कशासाठी?

Next
ठळक मुद्देदळभद्री मनपा : रा. कृ. पाटलांचे नाव पुसण्याचा घाट

गजानन जानभोर
नागपूर : रा. कृ. पाटील कोण होते ? भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेला हे कदाचित ठावूक नसावे. समजा माहीतही असेल तरी पाटील हे संघ स्वयंसेवक किंवा भाजपा विचारक नसल्याने महापालिकेतील सत्ताधाºयांना या महान देशभक्ताच्या त्यागाचे मोल कळणार नाही. हा अज्ञानाचा भाग की कुटीलांचे कारस्थान? कळायला मार्ग नाही. पण या ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या त्यागाचा अवमान करण्याचा घाट महापालिकेतील काही भाजपा नगरसेवकांनी घातला आहे. खेदाची बाब अशी की, या प्रकाराबद्दल महापौर नेहमीप्रमाणे ‘संभम्रात’ आणि पदाधिकारी ‘अनभिज्ञ’ आहेत. मग या पापाचे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध गडकरी-फडणवीसांनाच घ्यावा लागणार आहे.

शहरातील संविधान चौक ते हिस्लॉप कॉलेज चौक या मार्गाला पूर्वीपासून ‘स्व. रा.कृ.पाटील मार्ग’ असे नाव दिले आहे. परंतु हे नावच बदलविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून तशी जाहीर सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्धही करण्यात आली आहे. संबंधित मार्गाला असलेले रा.कृ. पाटील यांचे नाव बदलविण्यामागे मुख्य कारण असे की, संविधान चौक ते कल्याणेश्वर मंदिर पर्यंतच्या मार्गाला ‘सर कस्तूरचंदजी डागा मार्ग ’असे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासंदर्भात जाहीर सूचनेच्या माध्यमातून नागरिकांचे आक्षेप आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. महापालिकेचा नियम असा आहे की, एखाद्या चौकाचे किंवा मार्गाचे पूर्वीच नामकरण झाले असेल तर त्याबद्दलचा प्रस्ताव स्वीकारण्यात येत नाही आणि जाहीर सूचनेद्वारे आक्षेपसुद्धा मागविले जात नाहीत. असे असताना इथे या नियमाचा भंग करण्याचे धारिष्ट्य कसे झाले?
क स्तूरचंदजी डागा यांच्या नावाला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. डागा यांचे हे पुण्यतिथी शताब्दी वर्ष असून त्या निमित्ताने महापालिकेने त्यांच्या कार्याचे स्मरण करायलाच हवे. पण डागा यांचे नाव एका मार्गाला देण्यासाठी रा.कृ. पाटील यांच्यासारख्या महापुरुषाचे नाव पुसून काढणे, हा प्रकार केवळ संतापजनकच नाही तर महापालिकेच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे. कस्तूरचंद डागा हे नागपूरचे भूषण आहेत. ते दानशूर उद्योगपती होते. नागपूरच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पत्नी अमृताबाई यांनी एलएडी कॉलेज आणि डागा हॉस्पिटलची स्थापना करून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यामुळे कस्तूरचंदजी डागा यांच्या सेवाभावी दातृत्वाबद्दल साºयांच्याच मनात आदर आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त एकच नव्हे तर दहा मार्गांना त्यांचे नाव दिले तरी कुणाचा आक्षेप राहणार नाही. पण एका गांधीवादी कार्यकर्त्याचे नाव मिटवून त्या मार्गाला कस्तूरचंदजींचे नाव देण्याचा अश्लाघ्य प्रकार डागा कुटुंबीयांनाही आवडणारा नाही. पण असा विवेकभ्रष्ट विचार करताना महापालिकेतील सत्ताधारी एवढे निर्लज्ज होतील याची नागपूरकरांनी कल्पनाही के ली नसेल.
रा.कृ. पाटील हे सर्वोदयी विचारवंत होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम केला. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याच्या सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाने गौरविले देखील होते. ज्ञानी महापौर नंदा जिचकार आणि त्यांच्या महाज्ञानी उपमहापौरांना कदाचित असेही वाटू शकते की, रा.कृ. पाटील स्वातंत्र्य सैनिक तर होते, पण दानशूर नसावे. पण त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी एक गोष्ट येथे सांगणे आवश्यक आहे की, रा.कृ.पाटील यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत यवतमाळ जिल्ह्यातील स्वत:ची २०० एकर जमीन दान केली होती.
आता महापालिकेचा असाही युक्तिवाद असू शकतो की, आम्ही निर्णय घेतलेला नाही. केवळ या संदर्भात आलेल्या प्रस्तावांवर आक्षेप मागविले. समजा उद्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, झाशीची राणी, डॉ. हेडगेवार यांचे पुतळे हटविण्याबाबत अर्ज, प्रस्ताव आले तर त्यावरही अशी जाहीर सूचना देऊन आक्षेप मागविले जातील का? वस्तुस्थिती ही आहे की, महापालिकेला ना कस्तूरचंदजींबद्दल आदर आहे ना रा.कृ.पाटलांबद्दल. या नाठाळांना फक्त भ्रष्टाचाºयांचे हित साधायचे आहे. जिथे शेण खायला मिळते त्या सिमेंट रोडच्या टेंडरमध्ये अशा गफलती कधी होत नाहीत. तिथे मात्र ही मंडळी अतिशय सावध आणि गंभीर असतात. रा.कृ. पाटील, कस्तूरचंद डागा यांचे नाव एखाद्या वास्तू वा मार्गाला देण्यासाठी टेंडर काढावे लागत नाही, त्यामुळे हे सारेच जण जाणीवपूर्वक ‘संभ्रमात आणि अनभिज्ञ’ असतात. एकूणच हा प्रकार सामान्य माणसासाठी किळसवाणा आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही आपली माणसे एवढी दळभद्री निघतील असे वाटले नसेल, एवढे हे प्रकरण शोचनीय देखील आहे.
 

Web Title:  What is the hatred of patriots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.